जेएनयूनंतर जामियामध्येही PM मोदींवरील डॉक्युमेंट्रीमुळे वाद, काही विद्यार्थी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 05:34 PM2023-01-25T17:34:25+5:302023-01-25T17:35:10+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीशी संबंधीत डॉक्युमेंट्रीचा वाद वाढत चालला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बीबीसीने बनवलेल्या डॉक्युमेंट्रीचा (BBC Documentry) वाद वाढत चालला आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाl (JNU) डॉक्युमंट्रीच्या स्क्रीनिंगवरुन वाद झाला होता. त्यानंतर आता दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातही यावरुन वाद झाला आहे. जामियाच्या विद्यार्थ्यांसाठी या माहितीपटाचे स्क्रीनिंग सायंकाळी 6 वाजता ठेवण्यात आले आहे. मात्र, जामिया मिलिया प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या मेळाव्यावर बंदी घातली आहे.
मंगळवारी रात्री जेएनयूमध्ये माहितीपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान दोन विद्यार्थी गटांमध्ये वाद झाला होता. वादानंतर दगडफेकीच्या घटनाही घडल्याचा आरोप आहे. दिल्लीच्या जामिया मिलिया युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी आज संध्याकाळी 6 वाजता विद्यापीठ कॅम्पसमध्ये पीएम मोदींवरील बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीचे स्क्रीनिंग जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांच्या या घोषणेनंतर विद्यापीठ प्रशासनाने कारवाई केली आणि कॅम्पसमध्ये कोणत्याही प्रकारच्या मेळाव्यास बंदी घातली. काल रात्री जेएनयूमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जामिया प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
#WATCH जामिया मिल्लिया इस्लामिया यूनिवर्सिटी के बाहर नारेबाजी कर रहे प्रदर्शनकारियों को दिल्ली पुलिस ने हिरासत में लिया। pic.twitter.com/cAk338NNe2
— ANI_HindiNews (@AHindinews) January 25, 2023
सोशल साइट्सवर डॉक्युमेंट्री ब्लॉक
पीएम मोदींवरील माहितीपट भारतात सोशल मीडिया साइट्सवर ब्लॉक करण्याचे आदेश दिल्यानंतर वाद वाढला. मंगळवारी जेएनयूमध्ये डॉक्युमेंट्रीच्या प्रदर्शनावरुन झालेला वाद इतका वाढला की दगडफेकही झाली. दोन्ही विद्यार्थी गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. आज दिल्ली पोलिसांनी विद्यापीठात डॉक्युमेंटरी स्क्रीनिंगवरुन गोंधळ घालणाऱ्या चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.
जेएनयू प्रशासनाने वीज खंडित केली
विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंटरी स्क्रीनिंग केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर जेएनयू प्रशासनाने कॅम्पसची वीज खंडित केली होती. वीज खंडित झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या एका गटाने लॅपटॉप आणि फोनवर पीएम मोदींवरील माहितीपट दाखवला. वीज खंडित झाल्यानंतर कॅम्पसमध्ये अंधार पडला आणि काही विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली, त्यामुळे अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.