फिटनेसमुळेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बनलो : कोहली
By admin | Published: June 29, 2016 05:51 AM2016-06-29T05:51:03+5:302016-06-29T05:51:03+5:30
शारीरिक तंदुरुस्तीच्या बळावर मी केवळ उत्कृष्ट फलंदाजच नव्हे, तर क्षेत्ररक्षकही बनू शकलो, असे मत कसोटी कर्णधार विराट कोहली याने मंगळवारी व्यक्त केले
नवी दिल्ली : २०१२ च्या आयपीएलनंतर फिटनेसबाबत मी गंभीर झालो. शारीरिक तंदुरुस्तीच्या बळावर मी केवळ उत्कृष्ट फलंदाजच नव्हे, तर क्षेत्ररक्षकही बनू शकलो, असे मत कसोटी कर्णधार विराट कोहली याने मंगळवारी व्यक्त केले.
टीम इंडियात कोहली हा सर्वाधिक तंदुरुस्त खेळाडू आहे. त्याने सहकाऱ्यांकडूनही अशीच अपेक्षा बाळगली आहे. स्वत:च्या शारीरिक तंदुरुस्तीकडे कसे लक्ष दिले याबद्दल कोहलीने अनेक किस्से सांगितले. वेस्ट इंडिज दौरा हे संघापुढील पहिले आव्हान असल्याचे सांगून कोहली पुढे म्हणाला, ‘२०१२ च्या आयपीएलपूर्वी मी फिटनेसबद्दल काळजी करीत नव्हतो. पण नंतर सकाळ ते रात्रीपर्यंत काय खायचे, किती व्यायाम करायचा आणि सरावात किती वेळ घालवायचा याबद्दल माहिती घेतली. फिटनेसच्या बळावर मैदानावर मी काहीही करू शकतो, असा विश्वास मिळाला आहे. २०१२ मध्ये माझ्यात आत्मविश्वास नव्हता. फिटनेसमुळे आत्मविश्वास कमावला.’
कोहलीच्या फिटनेसचे कौतुक भारतीय संघाचे फिटनेस ट्रेनर शंकर बासू यांनीदेखील केले. ते म्हणाले, ‘विराट जगातील सर्वोत्कृष्ट अॅथलिट बनू इच्छितो. फिटनेस सुधारल्यामुळे फलंदाजीच नव्हे तर क्षेत्ररक्षणातही चपळता आली आहे.’ (वृत्तसंस्था)
जेव्हा तुम्ही फिट असता तेव्हा आपण काहीही करू शकतो, याबद्दल आत्मविश्वास संचारतो. मी कधीही वेगवान क्षेत्ररक्षक बनू शकलो नसतो. क्षेत्ररक्षणाची प्रत्येक जागादेखील मला पसंत नव्हती. पण फिट व तंदुरुस्त होताच क्षेत्ररक्षणातील सर्व पूर्वग्रह दूर झाले. फिट राहणे व योग्य आहार घेणे हाच माझ्या दैनंदिनीचा भाग बनला आहे.
- विराट कोहली, कर्णधार