सावधान! डोकलामपासून जवळच चीनने बांधली 400 मीटर उंचीची भिंत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 12:56 PM2017-11-24T12:56:37+5:302017-11-24T13:06:01+5:30
भारत आणि चीनमध्ये पुन्हा एकदा डोकलामवरुन संघर्ष निर्माण होऊ शकतो. दोन्ही देशांमध्ये डोकलामचा वाद मिटल्याचे चित्र दिसत असले तरी, प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी आहे.
नवी दिल्ली - भारत आणि चीनमध्ये पुन्हा एकदा डोकलामवरुन संघर्ष निर्माण होऊ शकतो. दोन्ही देशांमध्ये डोकलामचा वाद मिटल्याचे चित्र दिसत असले तरी, प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी आहे. डोकलाममधल्या वादग्रस्त भागातून माघार घेऊन चिनी सैन्य 400 मीटर आत गेले असले तरी चीन अजिबात गप्प बसलेला नाही. डोकलामपासून जवळच जिथे चिनी सैनिकांनी तळ ठोकलाय तिथे मोठया प्रमाणावर बांधकाम सुरु आहे.
झी न्यूजने गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार डोकलाममधल्या वादग्रस्त भागाच्या मागच्या बाजूला चीनने 400 मीटर उंचीची भिंत उभारली आहे. आपण काय करतोय याची कुणालाही खबर लागू नये यासाठी चीनने ही भिंत बांधली आहे. चीनकडून या भागात मोठया प्रमाणावर बांधकाम सुरु आहे तसेच मोठया संख्येने चिनी सैनिक इथे तैनात करण्यात आले आहेत. सैनिकांना सामावून घेण्यासाठी 16 बराक बांधण्यात आले आहेत. सहा बोगदे बांधण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. चिनी सैन्याच्या 23 ते 27 शेडस असून 200 पेक्षा जास्त तंबू ठोकण्यात आले आहेत.
भारतीय सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणी उपकरणेही बसवण्यात आली आहेत. एकूणच या भागातील चीनच्या वाढलेल्या हालचाली लक्षात घेता भारताला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. भारतानेही चीनला लागून असणा-या सर्व सीमांवर पायाभूत सुविधांच्या उभारणीला गती दिली आहे. युद्धाच्या प्रसंगात भारतीय सैन्याला सीमेपर्यंत कमीत कमी वेळेत सहज पोहोचता यावे यासाठी रस्ते बांधणीच्या कामावर जास्त लक्ष दिले जात आहे.
16 जूनपासून डोकलाममध्ये भारत आणि चीन संघर्षाला सुरुवात झाली होती. 73 दिवस दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर होते. भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा डोकलाममध्ये जिथे मिळतात त्या भागाला ट्राय जंक्शन म्हणतात. चीनने त्या ट्राय जंक्शनजवळ रस्ता बांधणीचे काम सुरु केल्यामुळे संघर्षाला सुरुवात झाली होती. कारण चीनने जर इथे रस्ता बांधला असता तर भारताचा रणनितीक दृष्टया महत्वाचा भूप्रदेश चीनच्या टप्प्यात आला असता.