‘जंगलराज’, ‘जंतरमंतर’पासून सावधान
By admin | Published: November 2, 2015 12:01 AM2015-11-02T00:01:03+5:302015-11-02T00:01:03+5:30
राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे ‘जंगलराज’ आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ‘जंतरमंतर’पासून सावध राहा. या दोघांनी मिळून बिहारला अंधकारात ढकलले आहे
मधुबनी : राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे ‘जंगलराज’ आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ‘जंतरमंतर’पासून सावध राहा. या दोघांनी मिळून बिहारला अंधकारात ढकलले आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात विकास आणि परिवर्तन घडवून आणण्याचे अभिवचन रविवारी दिले.
मोदी यांनी मधुबनी येथील निवडणूक प्रचार सभेत नितीशकुमार यांच्यावर नेम साधला. नितीशकुमार मनाने हरले आहेत आणि आता तर त्यांचा लोकशाहीवरील विश्वासही उडालेला आहे. त्यामुळे ते बाबांच्या भेटीला जात आहेत आणि ‘जंतरमंतर’ची मदत घेत आहेत. परंतु राज्याला केवळ एकच गोष्ट पुढे घेऊन जाऊ शकते आणि ती म्हणजे विकास. त्यांनी लोकशाहीची थट्टा चालविली आहे आणि लोकशाहीवर ज्यांचा विश्वास नाही तेच लोक जंतरमंतरची मदत घेत आहेत. जंतरमंतर केल्याने तुम्हाला वीज, पाणी, रोजगार, शिक्षण मिळेल काय, असा सवाल मोदींनी केला.
महाआघाडीला सत्तेवर येऊ दिले तर राज्यात अंधकार पसरेल, असा इशारा मोदी यांनी यावेळी दिला. मैथिलीच्या जनतेला शुभेच्छा देताना मोदी पुढे म्हणाले, या पवित्र भूमीला मी वंदन करतो. नव्या बिहारची आशा महिला आणि युवकांवर निर्भर आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे या भूमीवर अतोनात प्रेम करीत होते. (वृत्तसंस्था)