'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 06:15 PM2024-05-31T18:15:58+5:302024-05-31T18:17:12+5:30
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, निवडणूक आयोग माध्यमांना वार्तांकन करू नका, असे सांगू शकत नाही. निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, “उद्या पंतप्रधान त्यांच्या घरात ध्यान करत असतील आणि प्रसारमाध्यमांनी ते कव्हर केले तर ते उल्लंघन आहे का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवस चालणाऱ्या ध्यानधारणेदरम्यान आदर्श आचारसंहितेचे (MCC) उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्या, असा सल्ला निवडणूक आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला दिला आहे. तत्पूर्वी, देशातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने, पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या कन्याकुमारीतील ध्यान धारणेदरम्यानच शनिवारी सातव्या टप्प्याचे मतदान होणार आहे. यामुळे मतदानापूर्वी 48 तासांचा ध्यान धारणेचा कालावधी आदर्श आचार संहितेचे उल्लंघन आहे, अशा स्वरुपाची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती.
पंतप्रधान मोदींच्या प्रवासासाठी कुठल्याही परवानगीची आवश्यकता नाही -
हिन्दुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी परवानगीची गरज नाही, कारण ते भाषणे देत नाहीत. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, ही प्रक्रिया 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटी वापरल्या गेलेल्या प्रक्रिये प्रमाणेच आहे. तेव्हा मोदींनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वीच मौन काळात बद्रीनाथ आणि केदारनाथला भेट दिली होती.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, निवडणूक आयोग माध्यमांना वार्तांकन करू नका, असे सांगू शकत नाही. निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, “उद्या पंतप्रधान त्यांच्या घरात ध्यान करत असतील आणि प्रसारमाध्यमांनी ते कव्हर केले तर ते उल्लंघन आहे का? की विरोधी पक्ष असे म्हणत असेल तर हे उल्लंघन आहे? याला कसलाही अंत नाही.
पीएम मोदी मत मागत नाहीत -
निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, प्रत्येक उमेदवाराला चिन्ह आणि प्रतिकांच्या माध्यमातून संवाद साधण्याचा अधिकार आहे. पंतप्रधान मोदी मतं मागत नाहीत. विरोधकही अशा प्रकारे प्रतीकांची मदत घेऊ शकतात. आपण सर्वांनी कायद्याच्या कक्षेत राहून काम करावे लागेल.