सावधान! मोबाईल अॅपवरून झटपट कर्ज घेताय? RBI चा मोठा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 09:45 PM2020-12-23T21:45:54+5:302020-12-23T21:46:20+5:30
RBI Warning on Instant loan: रिझर्व्ह बँकेने नोंदणीकृत बँका आणि एनबीएफसीद्वारे डिजिटल कर्ज देण्याचे जे काम करतात त्यांना संबंधित वित्तीय संस्थांचे नाव ग्राहकांना स्पष्ट स्वरुपात सांगण्याचे आदेश दिले आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने लोकांना अनधिकृत पद्धतीने डिजिटल प्लॅटफ़ॉर्मवर (digital lending platforms) तसेच मोबाईल अॅपद्वारे कर्जासाठी केलेला अर्ज यावरून सावध रहाण्यास सांगितले आहे. आरबीआयने बुधवारी एक प्रसिध्दी पत्रक जारी करत सांगितले की, लोक आणि छोटे व्यावसायिक पटकन मिळणाऱ्या आणि कोणत्याही कटकटीशिवाय मिळणाऱ्या कर्जाच्या आमिषाला बळी पडू लागले आहेत.
अती व्याजदर आणि मागील दरवाज्याने जास्त पैसे उकळले जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे. याशिवाय वसुलीसाठी हे अॅप जबरदस्ती आणि कठोर उपाय करू लागले आहेत. हे स्वीकारार्ह नाही. तसेच हे अॅप कर्जदारांच्या मोबाईल नंबरचा दुरुपयोग करू लागले आहेत. लोकांना हा सल्ला आहे की त्यांनी अशा कोणत्याही भ्रामक प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच जर कर्ज घेत असतील तर त्या अॅपची आधी चांगल्या प्रकारे चौकशी करावी.
याचबरोबर आधार कार्ड, पॅन कार्डसह तुमची माहिती, केवायसी कोणत्याही अज्ञात लोकांसोबत किंवा अनधिकृत अॅपवर देऊ नये. त्यांनी अशाप्रकारच्या अॅपबाबत संबंधित बँक किंवा कायदेशीर प्राधिकरणाला याची माहिती द्यावी. याबाबतची तक्रार https:achet.rbi.org.in वर केली जाऊ शकते. कायदेशीर रित्या कर्ज देण्याचे काम बँक किंवा एनबीएफसी करू शकतात, ज्या आरबीआयकडे रजिस्टर असतील. तसेच त्या राज्य सरकारांद्वारे नियमित केल्या असतील.
रिझर्व्ह बँकेने नोंदणीकृत बँका आणि एनबीएफसीद्वारे डिजिटल कर्ज देण्याचे जे काम करतात त्यांना संबंधित वित्तीय संस्थांचे नाव ग्राहकांना स्पष्ट स्वरुपात सांगण्याचे आदेश दिले आहेत. या एनबीएफसींचे नाव आणि पत्ता आरबीआयच्या वेबसाईटवरून तपासता येणार आहे.