गाडी दामटताना सावधान, थेट दहा वर्षे घडेल तुरुंगवारी; हीट अँड रन प्रकरणांसाठी कडक तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 06:22 AM2023-08-13T06:22:51+5:302023-08-13T06:23:12+5:30
ब्रिटिशांनी अठराव्या शतकात केलेले तीन कायदे रद्द करून त्यांच्या जागी नवे कायदे लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : हिट अँड रन प्रकरणातील दोषीला दहा वर्षांपर्यंतच्या कारावासाची, तर बेदरकारपणे गाडी चालवून केलेल्या अपघातात लोक ठार झाले असल्यास त्यातील दोषीला सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद भारतीय न्यायसंहितेत करण्यात आली आहे.
ब्रिटिशांनी अठराव्या शतकात केलेले तीन कायदे रद्द करून त्यांच्या जागी नवे कायदे लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भारतीय दंडसंहितेऐवजी लागू होणाऱ्या भारतीय न्यायसंहितेच्या विधेयकात हिट अँड रन प्रकरणे व जीवघेण्या अपघातांबाबत या तरतुदी करण्यात आल्या आहेत. अपघात करणाऱ्या व नंतर पलायन केलेल्या, तसेच या अपघाताबद्दल पोलिसांना किंवा न्यायाधीशांना माहिती न देणाऱ्या वाहनचालकांना १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची व दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे.
भारतीय न्यायसंहितेच्या कलम १०४(२) मध्ये म्हटले आहे की, बेदरकारपणे वाहन चालवून धडक दिल्याने अपघातात जर कोणा व्यक्तीचा मृत्यू झाला असेल व तो चालक पळून गेला असल्यास या गुन्ह्यासाठी त्याला १० वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.