सावध व्हा; तुमच्या मुलांना असू शकतो मधुमेह! ‘एनसीबीआय’च्या संशोधनातील निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 08:12 AM2023-08-17T08:12:57+5:302023-08-17T08:16:17+5:30
अगदी लहान वयात मधुमेह झाल्यामुळे मुलांच्या दैनंदिन जीवनात अनेक बदल होत असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बदलत्या खाण्याच्या सवयी, जीवनशैली आणि कुटुंबात आजार असल्यामुळे लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. अगदी लहान वयात मधुमेह झाल्यामुळे मुलांच्या दैनंदिन जीवनात अनेक बदल होत असतात.
एनसीबीआय (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन) च्या अभ्यासानुसार १४.७ टक्के मुलांना मधुमेह आहे. अभ्यासात १ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना घेण्यात आले, ज्यामध्ये बहुतेक मुलांना पहिल्या प्रकाराचा (टाइप १) मधुमेह असल्याचे आढळून आले.
पालकांची बंधने ठरतात घातक
काही वेळा पालकही मधुमेही मुलाशी सामान्यपणे वागत नाहीत. त्यांना इतर मुलांबरोबर खेळू देत नाहीत किंवा आजारी असल्याचे सांगून त्यांच्या शारीरिक हालचालींवर बंधने घालतात. त्यामुळे मुलांना खूप एकटेपणा जाणवतो. हळूहळू ते स्वतःला समाजापासून, मित्रांपासून दूर करतात. कोणाशी बोलत नाहीत व गप्प बसू लागतात. त्यांच्या मनात नेहमी नकारात्मक विचार येतात. त्यामुळे ते नैराश्य, तणावाचे शिकार होतात.
लहान मुलांत मधुमेहामुळे बदल
- मधुमेह असलेली मुले लहान वयातच चिडखोर होतात, इतर मुलांच्या तुलनेत त्यांना लवकर राग येतो.
- या मुलांत तणाव आणि नैराश्यही वाढते.
- शाळेत त्यांना इन्सुलिन इंजेक्शन्स घेण्यासाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांकडे जावे लागते, ज्यामुळे त्यांच्यात वेगळेपणाची भावना येते.
काय कराल?
- मुलांना मधुमेह झाला तर आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका, मधुमेह असूनही त्यांच्या क्षेत्रात यश संपादन केलेल्या यशस्वी व्यक्तींची उदाहरणे द्या.
- मुलांना संपूर्ण आहार द्या.
- जर गोड खाण्याची इच्छा असेल तर मुलांना ‘ग्लुटेन फ्री’ मफिन्स, डार्क चॉकलेट द्या.
फास्ट फूडचे आकर्षण
मुलांना चॉकलेटपेक्षाही फास्ट फूड खाण्याची खूप इच्छा होते. पण डायबिटीसमुळे पालक मुलांना जंक फूड खाण्यापासून थांबवतात तेव्हा ते खूप चिडखोर, आक्रमक होतात.