परवानगीशिवाय मिरवणुका काढता येणार नाही, अन्य राज्यातील हिंसाचारादरम्यान योगी आदित्यनाथ यांचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 05:11 PM2022-04-19T17:11:01+5:302022-04-19T17:11:31+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांनी सोमवारी रमजान, ईद आणि अक्षय्य तृतीया यांसारख्या सणांच्या संदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
लखनौ : उत्तर प्रदेशचेमुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांनी सोमवारी आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची जबाबदारी आणि उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी आढावा बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी पोलिसांना अतिसंवेदनशील राहण्याच्या सूचना केल्या. तसंच परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही दिले. मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी सोमवारी रमजान, ईद आणि अक्षय्य तृतीया यांसारख्या सणांच्या संदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
योगी आदित्यनाथ यांनी तहसीलदार, उपजिल्हा दंडाधिकारी (SDM), मंडळ अधिकारी (CO) आणि स्टेशन प्रभारी यांना त्यांच्या तैनातीच्या क्षेत्रात रात्रीची विश्रांती घेण्याच्या सूचना दिल्या आणि उच्च अधिकार्यांना या व्यवस्थेचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यास सांगितले. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी स्टेशन प्रभारी, सीओ, पोलीस अधीक्षक, जिल्हा दंडाधिकारी आणि विभागीय आयुक्तांसह सर्व पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या रजा तात्काळ रद्द करण्याचे निर्देश दिले.
“प्रत्येक सण शांततेत आणि सौहार्दात पार पडला पाहिजे, त्यासाठी स्थानिक गरजांनुसार आवश्यक ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत आणि खोडसाळ विधाने करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अराजक घटकांसोबत सर्व कठोरतेनं वागलं पाहिजे. सुसंस्कृत समाजात अशा लोकांना स्थान नसावं,” असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
पोलिसांनी अतिसंवेदनशील राहावं
आगामी काळात अनेक धार्मिक सण आहेत. रमजानचा महिना सुरू असून ईद आणि अक्षय्य तृतीया एकाच दिवशी येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सध्याचे वातावरण पाहता पोलिसांना अतिसंवेदनशील राहावे लागणार आहे. स्टेशन प्रभारी ते एडीजीपर्यंत पुढील २४ तासांत आपापल्या भागातील धर्मगुरू, समाजातील इतर प्रतिष्ठित लोकांशी सतत संवाद साधण्याच्या सूचनाही योगी आदित्यनाथ यांनी दिल्या.
निर्धारित ठिकाणी पूजा
“पूजा अर्चना इत्यादी निर्धारित ठिकाणीच पार पडल्या पाहिजेत. तसंच रस्ते मार्ग, लोकांची येजा अडवून कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन होऊ नये. प्रत्येकाला आपल्या धार्मिक विचारांप्रमाणे उपासनेच्या पद्धतीचा अवलंब करण्याचं स्वातंत्र्य आहे. माईकचा वापरही करता येईल, परंतु तो त्या परिसरातून बाहेर जाता कामा नये. अन्य लोकांना त्यामुळे समस्या निर्माण होऊ नये,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
नव्या ठिकाणांना माईक लावण्याची परवानगी देण्यात येणार नाही. कोणत्याही परवानगीशिवाय शोभायात्रा, मिरवणुका काढण्यावर बंदी असेल. तसंच मंजुरी देण्यापूर्वी आयोजकांकडून शांतंतात कायम ठेवण्यासाठी शपथपत्र घेतलं जावं. केवळ पारंपारिक मिरवणुकांनाच परवानगी दिली जाईल, नव्या कार्यक्रमांना अनावश्यक मंजुरी देण्यात येऊ नये असंही योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं.