अरुणाचल असो वा काश्मीर... आम्ही कुठेही घेऊ शकतो जी-२० च्या बैठका, PM मोदींनी ठणकावले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 06:27 PM2023-09-03T18:27:53+5:302023-09-03T18:28:30+5:30
Narendra Modi: राजधानी दिल्लीमध्ये ९ आणि १० सप्टेंबर रोजी २०-२० शिखर संमेलन होत आहे. या संमेलनासाठी जगातील २० शक्तिशाली देशांचे प्रमुख दिल्लीत येणार असल्याने संपूर्ण जगाच्या नजरा दिल्लीकडे लागलेल्या आहेत.
राजधानी दिल्लीमध्ये ९ आणि १० सप्टेंबर रोजी २०-२० शिखर संमेलन होत आहे. या संमेलनासाठी जगातील २० शक्तिशाली देशांचे प्रमुख दिल्लीत येणार असल्याने संपूर्ण जगाच्या नजरा दिल्लीकडे लागलेल्या आहेत. त्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेश आणि काश्मीरच्या प्रश्नावरून चीन आणि पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. आम्ही बैठका कुठे घ्यायच्या हे सांगण्याचा अधिकार हा या दोन्ही देशांना नाही. त्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताकडून जी-२०च्या बैठका काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्याबाबत पाकिस्तान आणि चीनने घेतलेले आक्षेप फेटाळून लावले आहेत. यजमान देशानं त्याच्या कुठल्याही भागात बैठका घेणं स्वाभाविक आहे. तसेच हा त्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे.
भारताने मे महिन्यामध्ये कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत चीन आणि पाकिस्तानचा विरोध झुगारून लावत काश्मीरमध्ये जी-२०ची पर्यटनविषयक बैठक आयोजित केली होती. चीन आणि पाकिस्तानने हा भाग वादग्रस्त असल्याचं सांगत या बैठकांना आक्षेप घेतला होता. चीन हा जी-२० देश आहे. तर पाकिस्तान या संघटनेचा सदस्य नाही आहेत चीन भारताचं राज्य असलेल्या अरुणाचल प्रदेशवरही दावा ठोकत असतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जर आम्ही त्या ठिकांणी बैठका घेतल्या नसत्या तर त्याबाबत उपस्थित केले जाणारे प्रश्न वैध ठरले असते. आमचा देश एवढा विशाल, सुंदर आणि वैविध्यपूर्ण आहे. जेव्हा जी-२० च्या बैठका होत आहेत तेव्हा त्या आमच्या देशातील प्रत्येक भागात होणं स्वाभाविक नाही काय? एका दशकापेक्षा कमी काळात अर्थव्यवस्थेमध्ये पाच स्थानांनी प्रगती करणाऱ्या भारताच्या रेकॉर्डचा हवाला देत मोदींनी पुढच्या काही काळात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल, असा दावाही केला.