खेळणीनिर्मितीत अग्रेसर व्हा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 04:19 AM2020-08-31T04:19:54+5:302020-08-31T04:20:29+5:30
जगातील खेळणीनिर्मिती उद्योगातून ७ लाख कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, त्यामध्ये भारताचा वाटा अगदीच नगण्य आहे. त्यामुळे देशातील स्टार्टअप कंपन्यांनी खेळण्यांच्या निर्मितीत उतरले पाहिजे.
नवी दिल्ली : खेळणी बनविण्यामध्ये भारत जगातील अग्रेसर देश बनू शकतो. त्यासाठी स्टार्टअप कंपन्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात सांगितले.
ते म्हणाले की, जगातील खेळणीनिर्मिती उद्योगातून ७ लाख कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, त्यामध्ये भारताचा वाटा अगदीच नगण्य आहे. त्यामुळे देशातील स्टार्टअप कंपन्यांनी खेळण्यांच्या निर्मितीत उतरले पाहिजे. स्थानिक स्तरावरील खेळण्यांच्या निर्मिती व प्रसारावरही अधिक लक्ष दिले पाहिजे. देशातील तरुण व्यावसायिकांनी कॉम्प्युटर गेम विकसित केले पाहिजेत. ही आत्मनिर्भर भारतासाठी महत्त्वाची गोष्ट आहे.
देशातील तरुणांनी मायक्रोब्लॉगिंगसाठी असलेले कू, चिंगारी हे मोबाईल अॅप लोकप्रिय होत आहेत. कुटुकीकिड्स लर्निंग अॅप हेदेखील लहान मुलांना गणित, विज्ञान शिकविण्यासाठी खूप उपयोगी पडणारे आहे. भारतात बनविलेली ही अॅप लोकप्रिय होणे हे आत्मनिर्भर भारतासाठी चांगले चिन्ह आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
त्यांनी सांगितले की, कोरोना साथीच्या काळात जनतेने अत्यंत संयम राखून सण साधेपणाने साजरे केले. सध्या सणासुदीचे दिवस असले तरी लोकांनी शिस्त पाळून कोरोनाचा अधिक फैलाव होणार नाही, याची काळजीही घेतली आहे. आमचे सण व निसर्ग यांच्यात जवळिकीचे नाते आहे.
अज्ञात वीरांची माहिती उजेडात आणा
देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या घटनेला २०२२ साली ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. स्वातंत्र्य चळवळीतील अनेक अज्ञात वीरांच्या योगदानाची माहिती मिळवून ती शिक्षकांनी जगासमोर आणावी. या शौर्यगाथा आपल्या देशातील युवकांना माहीत असायला हव्यात.
भारतीय वंशाची कुत्री पाळा
देशातील नागरिकांनी भारतीय वंशाची कुत्री पाळण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. स्फोटके शोधण्याची उत्तम कामगिरी बजावणाऱ्या सोफी व विदा या भारतीय लष्करी पथकातील प्रशिक्षित श्वानांचा चीफ आॅफ आर्मी स्टाफ यांच्यातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला होता. त्या श्वानांच्या कामगिरीमुळे अनेक बॉम्बस्फोट टळले, असा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये केला.
परीक्षा पे चर्चा हवी होती -राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’मध्ये नीट, जेईई परीक्षेच्या मुद्यावर बोलतील, अशी विद्यार्थ्यांना आशा होती; परंतु पंतप्रधान खेळणींवर बोलले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर व्यक्त केली आहे. ‘मन की नहीं स्टुडन्ट की बात’ अशा हॅशटॅगचा वापर करून राहुल गांधी यांना टष्ट्वीटमध्ये म्हटले की, पंतप्रधान ‘परीक्षा पे’ चर्चा करतील, अशी जेईई, नीट परीक्षार्थींना आशा होती; परंतु पंतप्रधानांनी ‘खिलौने पे’ चर्चा केली. कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही परीक्षा स्थगित करण्यात याव्यात, अशी मागणी काही घटकांंकडून केली जात आहे. या मागणीला राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे.