सकारात्मक आत्मविश्वास बाळगा, यश नक्की मिळेल श्रमिक पत्रकार संघ : महेश लोंढे, संग्रामसिंग पाटील, भाग्यश्री वठारे, भाग्यश्री झेंडगेंचा वार्तालाप
By admin | Published: July 12, 2015 11:56 PM2015-07-12T23:56:36+5:302015-07-12T23:56:36+5:30
सोलापूर :
Next
स लापूर : आयुष्यात कोणतीही गोष्ट जर करायची असेल तर त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि प्रयत्न या तीन गोष्टींचा मेळ घातला पाहिजे. काही तरी करून दाखविणार्या तरूणांनी नेहमी सकारात्मक आत्मविश्वास बाळगला पाहिजे, यश नक्की मिळेल, असे मत युपीएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात हे विद्यार्थी बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, काशिनाथ भतगुणकी, केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झालेले बारलोणी माढ्याचे महेश लोंढे, संग्रामसिंह पाटील (पंढरपूर), भाग्यश्री वठारे (मंगळवेढा), फौजदार परीक्षा पास झालेल्या भाग्यश्री झेंडगे (मोहोळ) उपस्थित होते. यावेळी महेश लोंढे म्हणाले की, लोकांसाठी काम करण्याची आवड होती. पंढरपूर, अकलूज, पुणे असा प्रवास करीत शिक्षण घेतले. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. इंटरनेटमुळे आज अनेक गोष्टी शक्य झाल्या आहेत. लोकसेवा आयोगाच्या सेवेत येऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी कोणताही किंतु न ठेवता कठोर परिश्रमाची तयारी ठेवली पाहिजे. घरात सर्व लोक डॉक्टर आहेत मी सुद्धा डॉक्टर व्हावे असे सर्वांना वाटत होते, मात्र मला लोकसेवा करायची होती. त्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. जिद्द आणि चिकाटी ठेवून अभ्यास केला शेवटी मला यश मिळाले. युवकांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात अशीच जिद्द ठेवली पाहिजे, असे आवाहन संग्रामसिंह पाटील यांनी केले. मला पुण्यात एका मोठ्या कंपनीत नोकरी होती. पण माझ्या कौशल्याचा आणि ज्ञानाचा वापर हा फक्त मर्यादित लोकांसाठी होत होता. मला नेहमी लोकांसाठी काही तरी केले पाहिजे असे वाटत होते, त्यातूनच मी लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. अत्यंत बिकट आणि कठीण परिस्थितीवर मात करीत मी अभ्यास केला. घरच्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि शेवटी मी आयुष्याशी झगडत आज युपीएससीत यश संपादन केले, असे मत यावेळी भाग्यश्री वठारे यांनी व्यक्त केले. आयुष्यात काही तरी केले पाहिजे या प्रेरणेने मी एमपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. सध्या युपीएससी पास झालेले हणमंत झेंडगे हे माझे बंधू असून त्यांचे अनमोल मार्गदर्शन मला मिळाले. घरात राहून मोठ्या जिद्दीने मी परीक्षा दिली आणि यश संपादन केले. युवकांनी सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवा, तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, असे मत यावेळी भाग्यश्री झेंडगे यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक किरण बनसोडे यांनी केले तर आभार रामकृष्ण लांबतुरे यांनी मानले.(प्रतिनिधी)चौकट...न्यायिक भावना जोपासा : काळम-पाटीलजो जन्माला येतो तो जगणार असतो, पण तो कसा जगतो याला जास्त महत्त्व असते. सर्वसामान्य माणूस हा जगातील विद्वानांपेक्षा श्रेष्ठ असतो. त्यामुळे युपीएससी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पुढील काळात न्यायिक भावना डोळ्यासमोर ठेवून काम करावे. भविष्यात क्लास वन अधिकारी म्हणून काम करीत असताना अनेक परीक्षा द्याव्या लागणार आहेत. तिथे प्रश्नपत्रिका नसते, पण तिथे रोज उत्तरे शोधावी लागतील. हे करीत असताना बुद्धिमत्तेचा अहंकार बाळगू नका. यशस्वी होण्यासाठी बुद्धिमत्तेपेक्षा स्वत:चे तारतम्य सांभाळा, असे आवाहन यावेळी मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी युपीएससीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना केले. फोटो ओळ : सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापप्रसंगी डावीकडून महेश लोंढे, संग्रामसिंह पाटील, भाग्यश्री वठारे, भाग्यश्री झेंडगे दिसत आहेत.