Coronavirus : सज्ज राहा, कोरोना संपलेला नाही; जगाला धडकी, भारत सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 05:38 AM2022-12-23T05:38:20+5:302022-12-23T05:38:51+5:30
पंतप्रधानांनी घेतला आढावा
नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू झपाट्याने वाढत आहेत. जगातही रुग्ण वाढू लागले आहेत. भारतात मात्र नव्या दैनंदिन रुग्णांची संख्या २००च्या आत असली तरीही सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. कोरोना महामारी अजून संपलेली नाही. विमानतळांवर देखरेख ठेवण्याच्या उपाययोजना मजबूत करा. राज्यांनीही ऑक्सिजन पुरवठा व इतर बाबतीत सज्ज राहावे, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यात जागतिक परिस्थितीचा आढावा घेतला.
‘बीएफ.७ वाढला नाही’
पुणे : चीनमध्ये तर बीएफ.७ या नव्या व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने भारताचीही चिंता वाढली आहे. तज्ज्ञांनी मात्र, त्याचे दाेन रुग्ण आपल्याकडे जुलै आणि ऑक्टाेबरमध्ये आढळून आले व ते बरेही झाले. त्याचा प्रसार इतर राज्यांत काेठेच झालेला नाही. म्हणजेच ताे व्हेरिएंट आपल्याकडे वाढू शकला नाही. आपल्याला सध्या त्याची काही भीती नाही; परंतु, आपण खबरदारी घेत आहाेत, असे राज्याचे साथराेग सर्वेक्षण अधिकारी डाॅ. प्रदीप आवटे म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले...
कमजोर आणि वृद्धांसाठी बूस्टर डोसला प्रोत्साहन द्यावे. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा. सणासुदीच्या काळात गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी मास्क घाला. राज्यांनी रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांशी संबंधित सुविधा द्याव्या.
राज्यात येणाऱ्या विमान प्रवाशांचे थर्मल टेस्टिंग
नागपूर : कोरोनाबाबत राज्यात विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार विदेशातून राज्यात येणाऱ्या रॅन्डमली दोन टक्के विमान प्रवाशांचे सोमवारपासून विमानतळावर थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे. विधानभवनात कोविड संदर्भात गुरुवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. राज्यात लहान मुले व वृद्धांनी मास्क वापरावे. कोविड नियमांचे पालन करावे असे आवाहन सरकारने केले आहे. कोविडची पंचसूत्री लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला.