तयार राहा...सोमय्यांचा सर्वात मोठा घोटाळा समोर येणार; संजय राऊतांचा थेट लडाखमधून एल्गार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 01:21 PM2022-05-19T13:21:54+5:302022-05-19T13:22:38+5:30
किरीट सोमय्या हे काही साधूसंत नाहीत. त्यांनी केलेले कुठले आरोप सिद्ध झालेत ते सांगा. कोटीच्या कोटींचे आरोप करतात पण हाताला काहीच लागत नाही. यांच्या खोट्या आरोपांनाच उत्तर देत राहायचं का?
मुंबई-
किरीट सोमय्या हे काही साधूसंत नाहीत. त्यांनी केलेले कुठले आरोप सिद्ध झालेत ते सांगा. कोटीच्या कोटींचे आरोप करतात पण हाताला काहीच लागत नाही. यांच्या खोट्या आरोपांनाच उत्तर देत राहायचं का? सोमय्यांनी काय मोठे दिवे लावलेत का? अशा कठोर शब्दात टीका करत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज्यात परतल्यानंतर किरीट सोमय्यांचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचं विधान केलं आहे. संजय राऊत सध्या लडाखमध्ये असून एपीबी माझा वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सोमय्यांवर थेट लडाखमधून हल्लाबोल केला आहे.
बृजभूषण सिंह लढवय्या माणूस, मागे हटणार नाही; शिवसेनेनं केले कौतुक
"तुम्ही तोंडाला येईल ते बोलायचं. तुम्ही बकबक करायची आणि तुमच्या बकबकीला आम्ही उत्तर द्यायचं. कोण किरीट सोमय्या? अब्रुनुकसानीचा दावा केला म्हणजे त्यांनी काय मोठे दिवे लावले? हे काहीच नाहीय. मी इथून निघाल्यावर किरीट सोमय्याच्या फ्रॉडचं मोठं प्रकरण मुंबईत गेल्यावर सांगेन. भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे मुखवटे लावून खंडणी गोळा करणारे हे लोक आहेत", असं संजय राऊत म्हणाले.
छत्रपतींवर आमचे प्रेम, पण...; संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान
संजय राऊतांनी आजवर किरीट सोमय्यांवर विविध आरोप करत त्यांच्याशी निगडीत युवक प्रतिष्ठान संबंधिचे घोटाळे उघड केले आहेत. त्यांनी सोमय्यांविरोधात आरोपींची मालिकाच सुरू केली आहे. आता मुंबईत परतल्यानंतर ते कोणता नवा आरोप करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
बृजभूषण सिंह लढवय्या माणूस
संजय राऊत यांनी यावेळी भाजपाचे खासदार आणि राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे बृजभूषण सिंह यांचंही कौतुक केलं. "बृजभूषण शरण सिंह हे त्यांची भूमिका मांडत आहेत. बृजभूषण सिंह यांना मी अनेक वर्ष ओळखतो. तो माणूस लढवय्या आहे. त्यांचे महाराष्ट्राशी संबंध फार जुने आहेत. आम्ही त्यांना नेताजी म्हणतो. ते स्वत: पैलवान आहेत. अनेक कुस्तीगीर त्यांनी निर्माण केले. आम्ही एकत्र काम केले आहे तो माणूस मागे हटणार नाही असं वाटतं", अशा शब्दात राऊत यांनी त्यांचे कौतुक केले आहे.