विरोधकांशी कठोर संघर्ष करण्यास तयार राहा; भाजपा खासदारांना नरेंद्र मोदी यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 08:58 AM2023-03-29T08:58:09+5:302023-03-29T08:58:49+5:30
खासदारांनी एक महिना लोकांमध्ये राहावे व त्यांच्या समस्या दूर कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
- संजय शर्मा
नवी दिल्ली : मोदी सरकारची ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजप खासदारांनी एक महिनाभर जनतेत जाऊन सरकारच्या योजनांचा प्रचार करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. त्याचबरोबर जसजसा पक्ष पुढे जाईल तसतसा विरोधकांचा विरोध आणखी प्रखर होत जाणार असून, विरोधकांशी कठोर संघर्ष करण्यास तयार राहावे, असा इशाराही पंतप्रधानांनी दिला आहे. भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी भाजप खासदारांना २०२४ साठी विरोधकांशी कठोर संघर्ष करण्यास सांगितले आहे. खासदारांनी एक महिना लोकांमध्ये राहावे व त्यांच्या समस्या दूर कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
लाेकांमध्ये जा अन्...
मोदी सरकारची ९ वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त १५ मे ते १५ जूनपर्यंत भाजप खासदारांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघातील जनतेत जावे व त्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ द्यावा, असे निर्देश दिले.
काय दिले आदेश?
भाजपचा स्थापना दिवस ६ एप्रिल ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंतचा एक आठवडा ‘सामाजिक न्याय सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी खासदारांना दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना तंत्रज्ञान शिकण्याचे, तसेच ते उपयोगात आणण्यासही सांगितले आहे. सोशल मीडियापासून कोणत्याही माध्यमाचा उपयोग करून खासदारांनी केंद्र सरकारच्या कामांचा प्रचार-प्रसार करावा, असे त्यांनी म्हटले आहे.