मुख्यमंत्र्यांच्या घरी महिला खासदाराला मारहाण? स्वाती मालीवाल यांचा पोलिसांना फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 08:40 AM2024-05-14T08:40:00+5:302024-05-14T08:40:28+5:30
मुख्यमंत्री केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ‘आप’च्या राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी मारहाण झाल्याच्या वृत्ताचे गौडबंगाल दिवसभर कायम राहिले. कथित मारहाणीच्या वृत्तानंतर खुद्द मालीवाल दिल्लीच्या सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात पोहोचल्या, पण कोणतीही तक्रार न नोंदविता त्या निघून गेल्या. या प्रकरणी आतापर्यंत कोणतीही तक्रार नोंदविण्यात आलेली नसल्याचे उत्तर दिल्लीचे पोलिस उपायुक्त मनोज मीणा यांनी म्हटले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. तेथील कर्मचाऱ्यांनी मालीवाल यांना भेटीस मज्जाव केला आणि केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभवकुमार यांनी मारहाण केली, असा दावा मालीवाल यांनी केला आहे.
नेमके काय घडले?
- स्वाती मालीवाल या सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी मुख्यमंत्री निवासस्थानी गेल्या हाेत्या. त्यांना अरविंद केजरीवाल यांना भेटायचे हाेते.
- मात्र मालीवाल यांना मुख्यमंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांनी भेटू दिले नाही. त्यानंतर मालीवाल यांनी ९.३४ वाजता नियंत्रण कक्षाला काॅल केला. त्याची दखल घेत स्थानिक ठाण्याचे पाेलिस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले.
मालीवाल यांच्यावर भाजपचे प्रश्नचिन्ह
केजरीवाल यांना अटक झाली, तेव्हा मालीवाल भारतात नव्हत्या आणि बरेच दिवस त्या भारतात परतल्याही नाहीत. त्यांच्या अटकेवर मालीवाल यांनी मौन बाळगले होते, याकडे लक्ष वेधत भाजपच्या आयटी सेलचे प्रमुुख अमित मालवीय यांनी आम आदमी पार्टीमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे सूचित केले आहे.