विमानात मोबाइल चेक करताना पत्नीला समजलं नव-याचं लफडं!पत्नीच्या गोंधळामुळे दोहा-बाली विमानाचं चेन्नईमध्ये लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 04:52 PM2017-11-06T16:52:19+5:302017-11-06T17:22:23+5:30
दोहा येथून बालीला चाललेल्या कतार एअरवेजच्या विमानात नशेमध्ये तर्रर झालेल्या एका महिलेने मोठा गोंधळ घातल्याने ऐनवेळेला ते विमान चेन्नई विमानतळावर उतरवावे लागले.
चेन्नई - दोहा येथून बालीला चाललेल्या कतार एअरवेजच्या विमानात नशेमध्ये तर्रर झालेल्या एका महिलेने मोठा गोंधळ घातल्याने ऐनवेळेला ते विमान चेन्नई विमानतळावर उतरवावे लागले. रविवारी ही घटना घडली. गोंधळ घालणारी महिला इराणची नागरीक आहे. विमानामध्ये या महिलेने तिच्या नव-याचा मोबाइल चेक केला. त्यावेळी नवरा फसवणूक करत असल्याचे तिला समजले. त्यामुळे संतापाच्याभरात या महिलेने मद्यपान करुन विमानात गोंधळ घातला. या महिलेच्या शेजारच्या सीटवर तिचा नवरा डाराडूर झोपला होता. तिने वेळ घालवण्यासाठी म्हणून त्याचा मोबाइल घेतला.
पण मोबाइल लॉक असल्याने ओपन होत नव्हता. तिने नव-याचा हात स्कॅनरवर फिरवून मोबाइल ओपन केला. त्यावेळी नवरा आपली फसवणूक करत असल्याचे तिला समजले. संतापाच्या भरात या महिलेने मद्यपान केले व विमानातच नव-याबरोबर हुज्जत घालायला सुरुवात केली. विमानातील क्रू सदस्यांनी हस्तक्षेप करुन महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण महिला काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.
अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कॅप्टनने विमान चेन्नई विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेतला. चेन्नई विमानतळावर इराणीयन जोडपे आणि त्यांच्या मुलाला विमानातून उतरवल्यानंतर विमानाने बालीच्या दिशेने प्रयाण केले. सुरक्षेचा मुद्दा नसल्याने चेन्नई विमानतळावर या जोडप्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
या महिलेची नशा उतरेपर्यंत तिला चेन्नई विमानतळावरच थांबवून ठेवण्यात आले. ही महिला पूर्ण शुद्धीत आल्यानंतर या कुटुंबाने कौलाल्मपूरचे फ्लाइट पकडले आणि तिथून ते दोहाला रवाना झाले. प्रवाशाच्या गैरवर्तणूकीमुळे रविवारी सकाळी दहाच्या सुमारास कतार एअरवेजचे QR-962 दोहा-बाली विमान चेन्नईकडे वळवण्यात आल्याच्या वृत्ताला सीआयएसएफने दुजोरा दिला. भारतातल्या विमानतळांच्या संरक्षणाची जबाबदारी सीआयएसएफकडे आहे.