'आई बनून पोलिसांनी गावच्या लेकीची जबाबदारी घेतली, तर मामा म्हणून कन्यादानही केलं'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 05:25 PM2020-05-26T17:25:56+5:302020-05-26T17:26:29+5:30
कविता प्रजापत नामक मुलगी देवास येथे आपल्या वडिलांसमेवत राहत आहे. लॉकडाऊनमुळे तिच्या वडिलांची नोकरी गेली असून आईचे यापूर्वीच निधन झाले आहे.
इंदौर - कोरोना महामारीच्या काळात देशातील पोलिसांनी अभिमान वाटावा असं काम केलंय. राज्यातील आणि देशातील पोलिसांनी सुरुवातीला नागरिकांना धाक दाखवण्यासाठी काठी उचलली होती, पण आपल्या इतर कृतीतून पोलिसांनी नागरिकांच्या जखमांवर मलम लावण्याचं काम केलंय. गरिबांना जेऊ घालणं असो वा रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी मदत करणे असो, खाकी वर्दीतला माणूस हिरिरीने पुढे सरसावला आहे. इंदौरच्या देवास येथील एका गरीब मुलीच्या लग्नासाठीही पोलिसांनी असाच पुढाकार घेतला. विशेष म्हणजे आई नसलेल्या या मुलीची आई बनून पोलिसांनी तिचा विवाहसोहळा पूर्णत्वास नेला.
कविता प्रजापत नामक मुलगी देवास येथे आपल्या वडिलांसमेवत राहत आहे. लॉकडाऊनमुळे तिच्या वडिलांची नोकरी गेली असून आईचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे, लग्न ठरलेल्या आपल्या मुलीचे लग्न कसे करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. या कारणाने दोघे बाप-लेक चिंताग्रस्त होते. मात्र, तेथील पोलीस प्रशासनाची योजना असलेल्या 'हमारी पाठशाला' मोहिमेतल सदस्यांच्या कानावर ही गोष्ट गेली. त्यानंतर, पोलिसांनी पुढाकार घेऊन कविताच्या लग्नाची तयारी केली. सर्वप्रथम एसडीएम यांच्याकडून तिच्या लग्नासाठी परवानगी घेतली.
सोमवारी देवासच्या एसपी कृष्णावेणी देशावतु यांच्या मार्गदर्शनात पुलीस की पाठशाला की छांव या योजनेंतर्गत देवासची कन्य कविता हिचा विवाह संपन्न झाला. त्रिलोक नगर येथील युवक जितेद्र याच्यासोबत कविताने ७ फेरे पूर्ण केले. या लग्नसोहळ्यात पोलिसांनी आई बनून तिच्या लग्नाची जबाबदारी पार पाडली. तर, मामा बनून कन्यादानही केले. यावेळी, उपस्थित एसपी कृष्णादेवी यांच्यासह इतर पोलिस अधिकाऱ्यांनी तिला आशीर्वाद दिले. तसेच, लग्नाचे गिफ्ट म्हणून गृहपयोगी साहित्यही दिले. पोलिसांनी दाखवलेल्या या मातृत्व भावनेमुळे कविता व तिचे वडिल भावूक झाले होते.
दरम्यान, लग्नात सनईन चौघडे वाजविण्यास परवानगी नसल्याने पोलिसांनी गाडीचे सायरन वाजवून मुलीची इच्छा पूर्ण केली.