रेल्वे प्रवासात तुम्ही ब्लँकेट घेऊन झोपता? मग, ही बातमी वाचून धक्का बसेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 05:39 PM2018-02-08T17:39:18+5:302018-02-09T11:00:05+5:30
भारतीय रेल्वेबाबत आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वे राज्यमंत्री राजन गोहने यांनी बुधवारी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना ही माहिती दिली.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करायचा म्हटलं की आपण अनेकजण नाकं मुरडतो. त्याला कारण म्हणजे गलिच्छपणा आणि रेल्वेत पुरवली जाणारी सेवा. भारतीय रेल्वेबाबत आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वे राज्यमंत्री राजन गोहने यांनी बुधवारी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना ही माहिती दिली.
एक्स्प्रेसच्या एसी डब्यातून लांब पल्ल्याचा प्रवास करताना प्रवाशांना मुख्य चिंता असते ती म्हणजे रेल्वेनं पुरवलेलं ब्लँकेट. कारण अनेकदा हे ब्लँकेट मळलेलं असतं, त्यातून दुर्गंधी येत असते किंवा ते अनेक दिवसांपासून धुतलेलं नाहीये असं वाटतं. त्यामुळे रेल्वे खरंच ब्लॅंकेट कधी स्वच्छ धुत असेल की नाही असा प्रश्न अनेकदा पडतो.
रेल्वे राज्यमंत्री राजन गोहने यांनी याबाबत माहिती दिली आहे. रेल्वेने पुरवलेलं ब्लॅंकेट दोन महिन्यांमध्ये केवळ एकदाच धुतलं जातं असं गोहने यांनी स्पष्ट केलं. दोन महिन्यांमध्ये किमान एकदातरी ब्लॅंकेट धुतलं जातं असं ते म्हणाले. रेल्वेमध्ये रात्रीचा प्रवास करताना प्रवाशांना देण्यात येणारी चादर, बेडशीट, उशी किंवा उशीचे कव्हर प्रत्येक वापरानंतर धुतले जातील याची रेल्वे काळजी घेते, पण ब्लॅंकेट मात्र दोन महिन्यांमध्ये किमान एकदा धुतलं जातं अशी माहिती त्यांनी दिली. हिंदुस्थान टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.
- रेल्वेने ई- बेडरोल सुविधा सुरू केली आहे. ऑनलाईन तिकीट बुक करताना प्रवाशांना बेडरोलचा पर्याय उपलब्ध असतो. स्लीपर कोचमधील प्रवाशांनाही रेल्वेस्थानकावर बेडरोल किट दरानुसार वापरता येतो किंवा तिकीट खरेदी करतानाही ती सोय आहे.