बेदींवर वादाचे किरण
By admin | Published: January 22, 2015 03:29 AM2015-01-22T03:29:08+5:302015-01-22T03:29:08+5:30
भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी स्वातंत्र्यसेनानी लाला लाजपत राय यांच्या प्रतिमेच्या गळ्यात भाजपाचा भगवा गळपट्टा (स्कार्फ) घालून एक नवा वाद उभा केला आहे.
दिल्लीचे रण तापले : पुतळ््याला घातला भाजपाचा गळपट्टा
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी कृष्णानगरमध्ये स्वातंत्र्यसेनानी लाला लाजपत राय यांच्या प्रतिमेच्या गळ्यात भाजपाचा भगवा गळपट्टा (स्कार्फ) घालून एक नवा वाद उभा केला आहे. त्यांच्या या कृत्याची आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी निंदा केली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी बेदींनी राय यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या प्रतिमेची स्वच्छता केली आणि त्याला भाजपाचा भगव्या रंगाचा गळपट्टा घातला. या गळपट्ट्यावर भाजपाचे कमळाचे चिन्ह अंकित होते. मात्र थोड्यात वेळात त्यांनी तो गळपट्टा प्रतिमेच्या गळ्यातून काढूनही घेतला. गळपट्ट्याच्या या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, केजरीवाल यांनी स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांचे भगवेकरण करू नये, असे म्हटले आहे. कमीत कमी त्यांना तरी सोडून द्या़ ते कोणत्या पक्षाचे नसतात, ते देशाचे असतात. त्यांना भाजपा किंवा काँग्रेस अशा पक्षांत विभाजित केले जाऊ नये. बेदी यांनी रोड शोआधी कृष्णानगर येथील चहा विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते यांच्याशी संवाद साधला; नंतर उमेदवारी अर्ज दाखल केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
बेदी, केजरीवाल संधिसाधू - माकन
आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल व भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी हे दोघे संधिसाधू असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी केला आहे. या दोघांनी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी अण्णा हजारे यांचा वापर केल्याची टीकाही त्यांनी केली. बेदी या भूतकाळात चांगल्या पोलीस अधिकारी होत्या. मात्र राजकारण व प्रशासनात वेगळ्या क्षमतांची गरज असते, धैर्याची गरज असते. तुम्हाल सगळ्यांचे ऐकून घ्यावे लागते. मात्र त्या चांगल्या श्रोता नाहीत, असेही ते म्हणाले.
भाजपात कुठलाही पेचप्रसंग नाही - राजनाथसिंग
च्मुख्यमंत्रिपदासाठी किरण बेदी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पक्षात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असतानाच गृहमंत्री राजनाथसिंग यांनी मात्र भाजपात कुठलाच पेचप्रसंग नसून, पक्ष एकजुटीने निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन केले.
च्पक्षातील असंतोषाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सिंग यांनी भाजपात कुठलीच समस्या नाही. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीकरिता पक्षात एकजूट आहे, असा दावा केला.
च्कोणाला काही तक्रार असल्यास त्यांनी नेत्यांसोबत चर्चा करावी; त्याला मुद्दा बनविण्यात काहीच अर्थ नाही. पक्षाचे सर्व कार्यकर्ते दिल्लीतील निवडणुकीत आपले सहकार्य देतील, असे सिंग यांनी म्हटले आहे.
अरविंद केजरीवालांचा
नवी दिल्लीतून उमेदवारी अर्ज
आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी नवी दिल्ली मतदारसंघाकरिता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. त्यांच्या या अर्जामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतील लढत अधिक चुरशीची झाली आहे. अर्ज दाखल केल्यानंतर केजरीवाल यांनी आमचा लढा कोणा व्यक्तीविरुद्ध वा राजकीय पक्षाविरुद्ध नाही; तो भ्रष्टाचार व महागाईविरुद्ध असल्याचे म्हटले.
अण्णांचे कानावर हात
दिल्लीत राजकारण पेटलेले असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याबाबत कानावर हात ठेवले आहेत. त्याबद्दल आपल्याला बोलायचे नाही, असे स्पष्ट करीत आपचे अरविंद केजरीवाल असो किंवा भाजपाच्या किरण बेदी दोघांपासून चार हात लांब असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.