मेघालयात भाजप नेत्याची बीफ पार्टी
By admin | Published: June 2, 2017 12:41 AM2017-06-02T00:41:57+5:302017-06-02T00:41:57+5:30
केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल मेघालयातील भाजप नेत्याने बीफ पार्टी आयोजित करण्याचे ठरविले
शिलाँग : केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल मेघालयातील भाजप नेत्याने बीफ पार्टी आयोजित करण्याचे ठरविले असून, आता पक्ष त्याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ईशान्येकडील राज्यांमध्ये बीफ सर्रास खाल्ले जाते. तेथील राज्यांचा बीफबंदीला विरोध आहे. त्यामुळे भाजपचे मेघालयातील नेते बाचू चाम्बुगाँग माराक यांनी मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याने बीफ पार्टी देण्याची घोषणा केली आहे. माराक हे उत्तर गारो हिल्स जिल्हा भाजपचे अध्यक्ष आहे. त्यांनी फेसबुकवर आपण बीफ आणि बिची पार्टी देणार असल्याचे म्हटले आहे. मेघालयात तांदळापासून तयार करण्यात येणारी दारू बिची नावाने ओळखली जाते.
बीफ आमच्या नेहमीच्या जेवणातील खाद्यपदार्थ आहे. आमचे जेवण बीफशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, असे माराक यांचे म्हणणे आहे. बीफवर बंदी घालणे अयोग्य आहे, असे सांगतानाच, बीफवर बंदी घातली, तर आपण पक्ष सोडू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. बीफवर बंदी घातल्यास भाजपला गारो हिल्समध्ये आणि एकूणच मेघालयात विरोध होईल, कोणीही भाजपला पाठिंबा देणार नाही, असे सांगून ते म्हणाले की, भाजप बीफबंदी करील, असे आम्हाला वाटत नाही. (वृत्तसंस्था)
बाचू यांना नारळ?
बीफ पार्टीच्या घोषणेनंतर बाचू चाम्बुगाँग माराक यांना पक्षातून काढण्याचा विचार सुरू आहे.
भाजपचे ईशान्येकडील राज्यांचे प्रभारी नलीन कोहली यांनी माराक यांना पक्षातून निलंबित करण्यात येईल, असे सूचित केले आहे.
मेघालयात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत बीफबंदी हा भाजपला अडचणीचा मुद्दा ठरू शकेल. कत्तलीसाठी गुरांच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या अधिसूचनेनंतर पश्चिम गारो हिल्स जिल्हा भाजपचे अध्यक्ष बर्नार्ड एन मारक यांनी राजीनामा दिला आहे.
हा विषय तर
राज्यांचा : कोहली
नवी दिल्ली : स्थानिक लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी लक्षात घेऊ न संबंधित सरकारांनी बीफबंदीविषयी वा एकूणच गुरांच्या कत्तलीविषयी निर्णय घ्यावा, असे सांगत, या वादातून भाजपची सुटका करण्याचा प्रयत्नही नलीन कोहली यांनी केला.