मतदानाआधी उमेदवाराने मतदारांना वाटली सोन्याची नाणी, गहाण ठेवायला गेले असता बनावट असल्याचे झाले उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 01:58 PM2022-02-22T13:58:59+5:302022-02-22T13:59:28+5:30
Election Fraud News: तामिळनाडूमध्ये निवडणूक आयोगाने दिलेले आदेश धाब्यावर बसवत येथील अनेक राजकीय पक्षांचे उमेदवार मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी गिफ्ट देत असतात. अंबूरमध्ये एका अपक्ष उमेदवाराने चक्क सोन्याची नाणी वाटली. मात्र मतदारांना जेव्हा या नाण्यांचे सत्य समजले तेव्हा त्यांना धक्का बसला.
चेन्नई - तामिळनाडूमध्ये मतदारांना खूश करण्यासाठी रोख किंवा भेटवस्तू देणे ही आता परंपरा बनली आहे. निवडणूक आयोगाने दिलेले आदेश धाब्यावर बसवत येथील अनेक राजकीय पक्षांचे उमेदवार मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी गिफ्ट देत असतात. अंबूरमध्ये एका अपक्ष उमेदवाराने चक्क सोन्याची नाणी वाटली. मात्र मतदारांना जेव्हा या नाण्यांचे सत्य समजले तेव्हा त्यांना धक्का बसला.
नगरसेवकपदासाठी अंबूरच्या वॉर्ड क्रम. ३६ मधून अपक्ष उमेदवार मणिमेगालाई दुरईपंडी निवडणूक लढवत होत्या. दुरईपंडी यांनी १९ फेब्रुवारी रोजी नारळ या निशाणीला मत देण्याची विनंती करताना प्रचार केला होता. तसेच कथितपणे १८ फेब्रुवारी रोजी रात्री कथितपणे पतीसोबत मतदारांना भेटवस्तू दिल्या होत्या.
यावेळी मणिमेगलाई दुरईपंडी यांनी कथितपणे प्रत्येक कुटुंबाला एका छोट्या बॉक्समधून एक सोन्याचे नाणे दिले होते, असा दावा मतदारांनी केला. मात्र मतमोजणीपर्यंत हा बॉक्स उघडू नका, अशी विनंती त्यांनी मतदारांना केली होती. मतदारांनी सांगितले की, जर मतदानाच्या तीन दिवसांच्या आत या नाण्यांचा वापर केल्याचा प्रयत्न केल्यास, त्याची माहिती निवडणूक आयोगाला मिळेल. तसेच त्यांच्याकडून ती जप्त केली जातील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.
दरम्यान, रविवारी काही मतदारांनी ही नाणी गहाण ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जी बाब समोर आली त्यातून मतदारांना धक्का बसला. ही सोन्याची नाणी ही सोन्याची नसून तांब्याची असल्याचे समोर आले. मतदारांनी दावा केला की, मणिमेगालाई दुरईपंडी यांनी सोन्याचा पातळ थर दिलेली तांब्याची नाणी भेट म्हणून दिली होती.
गिफ्ट म्हणून सोन्याचं नाणं घेणाऱ्या एका महिलेने सांगितले की, मणिमेगलाई दुरईपंडी यांनी सांगितले होते की, त्यांनी २० लाख रुपयांमध्ये त्यांचं घर गहाण ठेवून ही सोन्याची नाणी खरेदी केली आहेत. दरम्यान, या प्रकरणामध्ये अद्याप पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.