भीक मागून 6.61 लाख रुपये कमावले, पुलवामा येथील शहिदांसाठी दान केले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 11:54 AM2019-02-22T11:54:26+5:302019-02-22T11:56:40+5:30
राजस्थानमधील अजमेर येथे रस्त्यावर भीक मागून उदरनिर्वाह चालवणाऱ्या महिलेनेही देशभक्तीचा आदर्श घालून दिला आहे.
अजमेर - पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत असून, गरिबांपासून श्रीमंतांपर्यत अनेकांनी या जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान, राजस्थानमधील अजमेर येथे रस्त्यावर भीक मागून उदरनिर्वाह चालवणाऱ्या महिलेनेही देशभक्तीचा आदर्श दाखवून दिला आहे. गतवर्षी मृत्यू झालेल्या या महिलेच्या अंतिम इच्छेनुसार तिच्या विश्वस्तांनी तिने जमवलेली सहा लाख. 61 हजार रुपयांची रक्कम पुलवामा हल्ल्यातील शहिदांसाठी दान केली आहे.
नंदिनी शर्मा नावाची महिला रस्त्यावर भीक मागून उदरनिर्वाह चालवत असे. अजमेर येथील बजरंगगड येथील अंबे माता मंदिरासमोर ती भीक मागत असे. दरम्यान, भीक मागून जमलेले पैसे ती बँकेत जमा करत असे. असे करून तिच्या नावावर मोठी ठेव जमली होती. मृत्यूनंतर या रकमेची देखभाल करण्यासाठी तिने दोन विश्वस्तांचीही नियुक्ती केली होती. तसेच मृत्यूनंतर आपला पैसा देश आणि समाजाच्या सेवेसाठी वापरला जावा, अशी इच्छा व्यक्त केली होती.
या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या विश्वस्तांना या रकमेचा विनियोग कसा करावा असा प्रश्न पडला होता. दरम्यान, पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या विश्वस्तांनी अजमेरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत ही रक्कम पुलमावा हल्ल्यातील पीडित जवानांना दान करण्याचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती नंदिनी या ज्या मंदिरासमोर भीक मागायच्या त्याच्या पुजाऱ्यांनी समजली तेव्हा त्यांनी नंदिनीच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी विशेष प्रार्थना आयोजित केली.