नव्या राजकीय समीकरणांची नांदी; तिरंगी समीकरणांमुळे बहुतेक जागी तुल्यबळ लढती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 06:41 AM2024-04-17T06:41:01+5:302024-04-17T06:41:07+5:30
तिरंगी लढतीत विजयाची हॅटट्रिक नोंदविण्याचे आव्हान एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीसमोर आहे.
असिफ कुरणे, लोकमत न्यूज नेटवर्क
चेन्नई : तिरंगी लढतीत विजयाची हॅटट्रिक नोंदविण्याचे आव्हान एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीसमोर आहे. यंदा पारंपरिक प्रतिस्पर्धी अण्णाद्रमुकसोबत भाजपच्या तगड्या आव्हानाचा सामना द्रमुकला करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे चांगल्या जागा मिळवत अण्णाद्रमुक पक्षाची धुरा आपणच यशस्वीपणे सांभाळू शकतो हे सिद्ध करण्याचे दडपण माजी मुख्यमंत्री ईडापड्डी पलानीस्वामी यांच्यावर आहे. त्यामुळे तामिळनाडूतील लोकसभेची ही निवडणूक नव्या राजकीय समीकरणांना आयाम देणारी ठरणार आहे.
शुक्रवारी तामिळनाडूतील सर्व ३९ जागांवर एकाच टप्प्यात मतदान होत आहे. अण्णाद्रमुकचे महासचिव ई. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वात डीएमडीके, एसडीपीआय व इतर पक्षांची आघाडीदेखील काही जागांवर तुल्यबळ लढती आहेत, तर पहिल्यांदाच स्वतंत्र लढणाऱ्या भाजपने पीएमके पक्षाशी युती करत आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रचारात द्रमुकने विकासाची कामे,केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आवाज उठवत आघाडी घेतली आहे, तर अण्णाद्रमुक पक्षाने पलानीस्वामी यांच्या नेतृत्वात जोरदार तयारी केली आहे.
२०२१ विधानसभेची आकडेवारी
पक्ष मिळालेल्या जागा मतांची टक्के
द्रमुक (एसपीए आघाडी) १५९(द्रमुक १३३) ३७.७०%
अण्णाद्रमुक (एनडीए आघाडी) ७५ (अण्णाद्रमुक ६६) ३३.३०%
२०१९ लोकसभा निवडणूक
एसपीए आघाडी ३८ (द्रमुक २०) ५३.५१%
एनडीए आघाडी ०१ (अण्णाद्रमुक १) ३०.५६%
एमआयएमचा अण्णाद्रमुकला पाठिंबा
- निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी अण्णाद्रमुक पक्षासोबत आघाडी केली आहे. अण्णाद्रमुकने भाजपशी संबंध तोडून टाकले आहेत.
- तसेच भविष्यात कसलीही आघाडी करणार नसल्याचे सांगत सीएए आणि एनआरसीला विरोध करण्याची ग्वाही अण्णाद्रमुुक नेतृत्वाने दिली असल्याने आपण त्यांना पाठिंबा देत असल्याचे ओवेसी यांनी सांगितले.