18 लाखांचं पॅकेज सोडून 'तो' विकू लागला उसाचा रस; होतेय बक्कळ कमाई, इतरांना देतो रोजगार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 10:59 AM2023-05-03T10:59:18+5:302023-05-03T11:06:15+5:30
एक उत्तम पॅकेजची नोकरी सोडून, तो बेगुसरायला परत आला आणि काही स्थानिक तरुणांसोबत ओके फ्रेश नावाने उसाच्या रसाचे दुकान उघडले.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियान सुरू केले. पंतप्रधानांच्या या मोहिमेचा फायदा होत आहे. नोकरी करण्याऐवजी तरुण आता रोजगार निर्माण करत आहेत. छोट्या स्टार्टअप्सच्या माध्यमातून ते केवळ नफा कमावत नाहीत, तर लोकांना रोजगार देऊन त्यांचे उत्पन्नही वाढवत आहेत. आजच्या युगात कोणतेही काम लहान-मोठे नसते, हे तरुणाईला समजले आहे. फक्त काहीतरी करण्याची जिद्द हवी. बेगुसराय जिल्ह्यातील रतनपूर गावात राहणारा तरुण गौरव कुमार याने ही कामगिरी केली आहे.
गौरव कुमारने 2012 मध्ये जयपूर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये एमबीएचा अभ्यास सुरू केला. 2014 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने 8 वर्षे आंतरराष्ट्रीय कंपनीत काम केले. 2022 मध्ये, एक उत्तम पॅकेजची नोकरी सोडून, तो बेगुसरायला परत आला आणि काही स्थानिक तरुणांसोबत ओके फ्रेश नावाने उसाच्या रसाचे दुकान उघडले. आज ओके फ्रेश हे ब्रँड नेम शहरात खूप लोकप्रिय आहे आणि त्यातून बक्कळ कमाई होत आहे.
18 लाखांचे पॅकेज सोडून उसाच्या रसाची विक्री
बेगुसराय जिल्ह्यातील रतनपूर येथील रहिवासी असलेल्या गौरव कुमारने सांगितले की, तो 18 लाखांच्या वार्षिक पॅकेजवर दिल्ली, कोलकाता सारख्या मोठ्या शहरांमध्ये काम करत होता. 8 वर्षे सतत काम केल्यानंतर मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. नुकतीच नोकरी सोडून गावी परतलो. काही स्थानिक तरुण मित्रांसोबत ओके फ्रेश नावाने उसाच्या रसाचे दुकान उघडले. बेगुसराय शहरातील कालीस्थान चौक, चुन्निनाल मेगा मार्टसह तीन ठिकाणी सध्या उसाच्या रसाची विक्री सुरू आहे. या संपूर्ण व्यवसायात 10 जणांना रोजगार मिळत आहे. गौरव कुमार यांनी सांगितले की, 5 लाखांपर्यंत महिन्याचा टर्नओवर आहे.
20 पेक्षा जास्त फ्लेवर्समध्ये उसाचा रस
गौरव कुमारने सांगितले की, उसाचा रस लोकांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी अनेक घटक मिसळले आहेत. लोकांना उसाचा रस 20 पेक्षा जास्त फ्लेवरमध्ये दिला जात आहे. असोसिएट मुरारी मिश्रा यांनी सांगितले की, येथे ग्राहकांना गुलाब, चिली स्पाइस, मिंट, फ्रेश फ्रूट, लेमन जिंजर यांसारख्या 20 हून अधिक फ्लेवर्स उपलब्ध आहेत. पुढे सांगितले की, उसाच्या रसाचे अनेक फ्लेवर्स इंटरनेटवर सर्च करून प्रयोग आणि चाचणी करून बाजारात आणले आहेत. उसाच्या रसासोबत नाचोस सारख्या स्नॅक्सचा कॉम्बोही इथे मिळतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"