बाबो! कर्ज काढून, जमीन विकून बायकोला शिकवलं, शिक्षण पूर्ण होताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 02:18 PM2024-07-18T14:18:44+5:302024-07-18T14:30:15+5:30
एका तरुणाने आपली जमीन विकून आपल्या पत्नीला शिकवलं. मात्र पतीने आरोप केला आहे की, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पत्नीचा दृष्टिकोन बदलला आहे. तिला आता पती आणि सासरच्या लोकांसोबत राहायचं नाही
बिहारमधील बेगुसरायमध्ये एका तरुणाने आपली जमीन विकून आपल्या पत्नीला शिकवलं. मात्र पतीने आरोप केला आहे की, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पत्नीचा दृष्टिकोन बदलला आहे. तिला आता पती आणि सासरच्या लोकांसोबत राहायचं नाही. १५ जून रोजी महिलेने तिचे वडील आणि भावाला बोलावलं आणि घरातील सर्व सामान घेऊन माहेरी गेल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तिच्या सासूने सून, वडील व भावाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण बेगुसरायच्या अमारी गावातील आहे. येथे राहणाऱ्या बालेश्वर महतो यांचा मुलगा प्रिन्स आनंद याचं लग्न मनीषा हिच्यासोबत २४ एप्रिल २०१९ समस्तीपूरच्या विभूतीपूर पोलीस स्टेशन परिसरात झाला होता. मनीषा बारावी पास होती. सासरच्या घरी आल्यावर तिने पती आणि सासू-सासऱ्यांसमोर पुढचा कोर्स करण्याची इच्छा व्यक्त केली.
पती आणि सासरच्या मंडळींनी यानंतर कर्ज घेऊन सुनेला २०१९ साली पंजाबच्या अजित नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊन दिला. मनीषा कधी घरी तर कधी माहेरी राहायची. ती फक्त परीक्षा देण्यासाठी पंजाबला जात असे. याच दरम्यान, १४ नोव्हेंबर २०२१ रोजी तिला मुलगीही झाली. यानंतर मनीषाने समस्तीपूर आणि खगरिया येथे काम केलं.
डिसेंबर २०२३ मध्ये मनीषाने तिचे शिक्षण पूर्ण करताच आपल्या पतीसोबत राहण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये मोठा वाद सुरू झाला. अनेकवेळा पंचायत झाली, पण तोडगा निघाला नाही. त्यानंतर याप्रकरणी मनीषाची सासू सुलेखा यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
सुलेखा यांनी आरोप केला आहे की, १५ जून रोजी मनीषा तिचे वडील राजेंद्र महतो आणि भाऊ रोशन यांच्यासह ५-७ शस्त्रधारी लोकांसह आली होती. तिचं सामान घेण्यासोबतच माझ्याकडील २ लाख २५ हजार व ५० हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन ती निघून गेली.
१ जुलै रोजी पत्नीने प्रिन्सला फोन करून बोलावून त्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिलं. याची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून प्रिन्सला पोलिसांच्या ताब्यातून सोडवलं. प्रिन्सच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की त्यांनी १० जुलै रोजी छोराही पोलीस ठाण्यात सून आणि तिचे वडील आणि भावाविरुद्ध तक्रार दाखल केली होती, परंतु पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही.