दे घुमा के... सुषमा स्वराज यांचा पाकिस्तानवर 'स्ट्राईक'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 11:47 AM2019-03-27T11:47:26+5:302019-03-27T11:49:28+5:30
एअर स्ट्राइकनंतरच्या घडामोडीवरुन पाकिस्तानला सवाल
गाझियाबाद: भारतीय हवाई दलानं बालाकोटमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याला पाकिस्ताननं दिलेल्या प्रत्युत्तरावरुन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सवाल उपस्थित केला आहे. भारतानं जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हल्ले होते. मग पाकिस्ताननं जैशच्या वतीनं भारताला प्रत्युत्तर दिलं का, असा प्रश्न स्वराज यांनी विचारला. आमच्या हवाई दलानं एअर स्ट्राइक करताना त्यांच्या नागरिकांच्या केसालाही धक्का लागू दिला नाही. त्यांच्या सैन्यावरही हल्ला करण्यात आला नाही. मग पाकिस्ताननं दुसऱ्या दिवशी हल्ला का केला? त्यांनी जैशच्या वतीनं प्रत्युत्तर दिलं का?, असे प्रश्न स्वराज यांना पाकिस्तानला विचारले आहेत. त्या भाजपाच्या गाझियाबादमधील संकल्प सभेत बोलत होत्या.
'पुलवामा हल्ल्यानंतर भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा पाठिंबा मिळाला. आपण युद्ध करू, अशी भीती पाकिस्तानला होती. त्यांनी मदतीसाठी अनेकांना फोन केले. भेटीगाठी घेतल्या. पण आपण एक जबाबदार आणि शांतताप्रिय राष्ट्र आहोत. त्यामुळे आपण परिस्थिती बिघडू दिली नाही. मात्र पाकिस्ताननं पुन्हा आगळीक केल्यास आम्ही शांत बसणार नाही,' असा अप्रत्यक्ष इशारा स्वराज यांनी पाकिस्तानला दिला. गाझियाबादमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या प्रचारसभेला आलेल्या स्वराज यांनी उपस्थितांना संबोधित केलं.
पुलवामा हल्ला आणि त्यानंतर करण्यात आलेला एअर स्ट्राइकचा उल्लेख करत स्वराज यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेतलं. '2008 मध्ये देशावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी तत्कालीन सरकारनं आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा घ्यायला हवा होता. पाकिस्तानला एकाकी पाडायला हवं होतं. मात्र त्यांनी संधी गमावली,' अशा शब्दांमध्ये त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं.