मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करा!
By admin | Published: March 3, 2017 04:36 AM2017-03-03T04:36:37+5:302017-03-03T04:36:37+5:30
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन याचे शिर कलम करणाऱ्यास १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली
इडुक्की : केरळमध्ये डावे पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील संघर्ष एवढ्या खालच्या पातळीवर पोहोचला आहे की, संघाच्या नेत्याने केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन याचे शिर कलम करणाऱ्यास १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. भारतात असा प्रकार घडण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.
विजयन यांच्या खुनासाठी १ कोटी रुपये देण्याचे भयंकर विधान डॉ. चंद्रावत यांनी उज्जैन येथील कार्यक्रमात केले. खासदार चिंतामणी मालवीय आणि आमदार मोहन यादव यावेळी उपस्थित होते. विजयन यांचे शिर आणणाऱ्यास बक्षीस देण्यासाठी प्रसंगी आपण आपली मालमत्ता विकू, असेही ते म्हणाले. केरळमध्ये मार्क्सवाद्यांच्या अत्याचाराविरुद्ध आयोजित विशाल धरणे आंदोलनात ते बोलत होते. या भाषणाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात ते विजयन यांचे शिर कलम करणाऱ्यास बक्षीस देण्याचे विधान करताना दिसतात.
विजयन समजतात की हिंदूंच्या रक्तात धमक नाही. मी घोषणा करतो की, जो कोणी त्याचे शिर कलम करील त्याला मी माझे घर आणि संपत्ती देईन. मात्र, अशा द्रोह्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही. गोध्राचा उल्लेख करून चंद्रावत म्हणाले की, गोध्रा विसरलात काय? ५६ मारले होते. २,०००
गाडले गेले. डाव्यांनो कान देऊन ऐका, तुम्ही ३०० प्रचारक आणि कार्यकर्त्यांची हत्या केली. त्या बदल्यात आम्ही भारतमातेला ३ लाख शिर अर्पण करू.
डॉ. चंद्रावत यांच्या या वक्तव्यावरून वाद उफाळताच, ही आमची अधिकृत भूमिका नाही, असे घाईघाईने जाहीर कले आहे.
संघासह उजव्या विचारसरणीच्या संघटना गेल्या अनेक वर्षांपासून देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. संघाने मुसोलिनीची संघटनात्मक संरचना आणि हिटलरची विचारसरणी अवलंबिली आहे. या दोन हुकूमशहांनी जगाला घाबरवून सोडले होते, असे विजयन गेल्या आठवड्यात म्हणाले होते. महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे आरएसएसच्या हातचे बाहुले होते. षड्यंत्र रचून गांधींची हत्या करण्यात आली, असेही त्यांनी म्हटले होते. (वृत्तसंस्था)
>मोदींच्या अपमानावरून बिहार विधानसभेत गोंधळ
नितीशकुमार सरकारमधील मंत्री अब्दुल जलील मस्तान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ रालोआ आमदारांनी गुरुवारीही बिहार विधानसभेच्या
दोन्ही सभागृहांचे कामकाज बंद पाडले. त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन मस्तान यांच्या हकालपट्टीची मागणी केली तसेच त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. प्रकरण तापत असल्याचे पाहून जलील मस्तान यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली होती. दुसरीकडे बिहार भाजपने जोपर्यंत जलील मस्तान यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. नोटाबंदीविरुद्धच्या एका आंदोलनादरम्यान जलील मस्तान यांनी पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे आवाहन केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
>हीच संघाची मानसिकता : विजयन
या धमकीबाबत विजयन म्हणाले की, रा. स्व. संघाची मानसिकता काय आहे, हेच यावरून स्पष्ट होते. संघ परिवाराने या प्रकारे आधीही अनेकांचे शिरच्छेद केल्याचा आरोपही त्यांनी केला.