सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे निमंत्रण घेतले मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 05:07 AM2019-01-09T05:07:48+5:302019-01-09T05:08:15+5:30
नयनतारा सहगल यांचा आरोप; मराठी साहित्य संमेलनाचा वाद
डेहराडून : यवतमाळ येथे शुक्रवारपासून तीन दिवस आयोजिलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून मला दिलेले निमंत्रण आयोजकांनी महाराष्ट्रातील सत्ताधाºयांच्या राजकीय दबाबामुळेच मागे घेतले, असा आरोप ख्यातनाम लेखिका नयनतारा सहगल यांनी केला आहे.
त्या म्हणाल्या की, माझे विचार काय आहेत, मी कोणत्या स्वरूपाचे लेखन केले आहे, याची संपूर्ण माहिती साहित्य संमेलनाच्या आयोजकांना होती. माझे विचार मी आजवर खुलेपणाने मांडत आले आहे. त्या पार्श्वभूमीवर मला त्यांनी आनंदाने निमंत्रण दिले होते. मी यवतमाळला जायची तयारीही केली होती. मात्र, गेल्या रविवारी मला आयोजकांकडून निमंत्रण रद्द केल्याचा तीन ते चार ओळीचा ई-मेल आला.
मोदी सरकारच्या राजवटीत मूलतत्त्ववाद व असहिष्णू वृत्ती वाढत असल्याच्या निषेधार्थ नयनतारा सहगल यांनी २०१५ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला होता. या पुरस्कार वापसीचे नंतर काही मान्यवरांनी अनुकरण केले. सहगल यांनी लिहिलेल्या ‘रीच लाईक अस’ या कादंबरीसाठी १९८६ मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी पुन्हा निमंत्रण धाडले तरी आता आपण तिथे जाणार नसल्याचे त्यांनी सोमवारीच स्पष्ट केले होते. (वृत्तसंस्था)
महाराष्ट्राच्याच कन्या
नयनतारा सहगल या एक प्रकारे महाराष्ट्राच्याच कन्या आहेत. त्यांचे वडील रणजित पंडित हे मूळचे कोकणवासी. ते विख्यात संस्कृत पंडित होते. त्यांनी कल्हणाच्या राजतरंगिणी या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले होते. स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतल्यामुळे त्यांनी कारावासही भोगला होता. रणजित पंडित यांचे १९४४ मध्ये निधन झाले. नयनतारा या विजयालक्ष्मी पंडित यांची मुलगी व पं. जवाहरलाल नेहरू यांच्या भाची आहेत.