सशक्त असण्याचा अर्थ 'या' आठ महिलांनी समजावला

By admin | Published: May 8, 2016 11:24 AM2016-05-08T11:24:44+5:302016-05-08T12:31:57+5:30

अनेकदा पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी लेखले जाते. पण याच भारतात काही अशा महिला आहेत ज्यांनी आपल्या कार्य, कर्तुत्वाने जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडली.

Being empowered means that eight women have understood this | सशक्त असण्याचा अर्थ 'या' आठ महिलांनी समजावला

सशक्त असण्याचा अर्थ 'या' आठ महिलांनी समजावला

Next

ऑनलाइन लोकमत 

 
स्त्री-पुरुष समानता, त्यांचे अधिकार यावरुन समाजात नेहमी वादविवाद सुरु असतात. अनेकदा पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी लेखले जाते. पण याच भारतात काही अशा महिला आहेत ज्यांनी आपल्या कार्य, कर्तुत्वाने जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडली. स्वत:ला सिद्ध करताना त्यांनी कुठेही स्त्रीत्वाचा आधार न घेता पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे जात आपले कर्तुत्व दाखवून दिले. अशाच आठ महिलांची आम्ही आपल्याला ओळख करुन देत आहोत. 
 
 
१) नीरजा भानोत 
१९८६ साली मुंबईहून अमेरिकेला निघालेल्या पॅन एएम फ्लाईट ७३ चे दहशतवाद्यांनी पाकिस्तानात अपहरण केले. त्यावेळी विमानातील ३५० प्रवाशांचे प्राण वाचवताना नीरजा अतिरेक्यांच्या गोळयांना बळी पडली. जेव्हा निरजाचा मृत्यू झाला तेव्हा ती वयाच्या विशीमध्ये होती. तिने जे शौर्य, धाडस दाखवले त्यासाठी भारत सरकारने तिला 'अशोक चक्र'ने सन्मानित केले.  हा पुरस्कार मिळवणारी ती सर्वात तरुण भारतीय आहे. नीरजाने दाखवून दिले की, धाडस, हिम्मत ही कोणा एकाची मक्तेदारी नाही किंवा त्याचा वयाशीही संबंध नाही. 
 
२) कल्पना चावला 
कल्पना चावला भारताची पहिली महिला अवकाशवीर आहे. कल्पना चावलाच्या कामगिरीमुळे आजही प्रत्येक देशवासियाची मान अभिमानाने उंचावते. भारतीय-अमेरिकन वंशाच्या कल्पना चावलाचे २००३ मध्ये एका अवकाश दुर्घटनेत निधन झाले. २००३ मध्ये कल्पना सात अवकाशवीरांसह अवकाश मोहिम आटोपून पृथ्वीवर परतत असताना कोलंबिया अवकाश यानाचा वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करताच स्फोट झाला. त्यात कल्पनासह सात अवकाशवीरांचा मृत्यू झाला. 
 
 
३) इरॉम चानू शर्मिला 
आपल्या मजबूत इराद्यांमुळे मणिपूरची आयर्न लेडी म्हणून इरॉम शर्मिला यांची संपूर्ण जगभरात ओळख आहे. लष्कराला विशेष अधिकार देणारा एएफएसपीए कायदा रद्द करावा यासाठी २००० साली इरॉम शर्मिला बेमुदत उपोषणाला बसल्या. मालोम हत्याकांडानंतर इरॉम यांनी बेमुदत उपोषण सुरु केले. इरॉम यांचे उपोषण अजूनही सुरु असून, जगातील हे सर्वात मोठे उपोषण आंदोलन समजले जाते. त्यांचा खंबीरपणा आणि हिम्मत अनेकांना प्रेरणा देऊन जाते. 
 
 
४) लक्ष्मी 
लक्ष्मी १५ वर्षाची असताना तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या माणसाने तिला लग्नासाठी मागणी घातली. पण लक्ष्मीने तो प्रस्ताव फेटाळून लावला. म्हणून चिडलेल्या त्या माणसाने लक्ष्मीवर अॅसिड हल्ला केला. यामध्ये लक्ष्मीचे मोठे नुकसान झाले. पण ती खचली नाही. तिने उलट ज्या महिलांवर समाजामध्ये अॅसिड हल्ले झाले आहेत त्यांच्या कल्याणासाठी काम सुरु केले. 'ती' आता भारतातील अॅसिड हल्ल्यातील पिडीतांचा आवाज बनली आहे. तिने अलीकडेच कपडयांच्या एका जाहीरातीत काम केले.
  
 
५) इंद्रा नुयी 
फोर्ब्सच्या जगातील १०० पॉवरफुल महिलांच्या यादीत इंद्रा नुयी १३ व्या स्थानी आहेत. त्या पेप्सिको या जगातील बलाढय कंपनीच्या सीईओ आहेत. एवढेच नव्हे तर, जगातील पॉवरफुल मॉम्सच्या यादीत फोर्ब्सने त्यांना तिसरे स्थान दिले आहे. ज्या महिलांना कॉर्पोरेट क्षेत्रात ठसा उमटवण्याची महत्वकांक्षा आहे त्यांच्यासाठी इंद्रा नुयी एक प्रेरणास्त्रोत आहेत. 
 
६) भनवरी देवी 
बाल विवाह रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर भनवरी देवीवर वरच्या जातीतील पुरुषांनी सामूहिक बलात्कार केला होता. पण इतका मोठा आघात होऊनही भनवरी देवी आपल्या उद्दिष्टापासून तूसभरही ढळली नाही. भनवरी देवी या राजस्थानातील दलित, सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. 
 
७) सुनिता क्रिष्णन 
सुनिता या सामाजिक कार्यकर्त्या असून, त्या प्रज्वला या एनजीओच्या सहसंस्थापक आहेत. वेश्या व्यवसायासाठी केल्या जाणा-या मानव तस्करी विरोधात त्या काम करतात. एनजीओच्या माध्यमातून सेक्स वर्क्सच्या पुर्नवसनाचे काम त्या करतात. वयाच्या १५ व्या वर्षी सुनिता क्रिष्णन यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. त्या जे काम करतात त्यामुळे त्यांना अनेकदा धमक्या मिळाल्या. पण त्यानंतरही त्या मानव तस्करी विरोधात अधिक सशक्तपणे काम करत आहेत. 
 
८) प्रियांका चोप्रा 
बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला गॉडफादरची गरज नाही हे  प्रियांका चोप्राने सिद्ध केले आहे. २००० साली मिस वर्ल्डचा किताब मिळवणा-या प्रियांकासाठी करीयरची फारशी चांगली सुरुवात झाली नव्हती. पण प्रियांकाने आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर बॉलिवु़डचे नव्हे तर, हॉलिवुडमध्येही यशाच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. 
 

Web Title: Being empowered means that eight women have understood this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.