माझा मुलगा असल्याने; कार्तीला टार्गेट केलं जातं - चिदंबरम
By admin | Published: March 7, 2016 10:04 AM2016-03-07T10:04:30+5:302016-03-07T11:15:31+5:30
माझ्यावर निशाणा साधायचा आहे मात्र माझ्याऐवजी माझा मुलगा कार्ती चिदंबरमवर निशाणा साधला जात असल्याचा आरोप पी चिदंबरम यांनी केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ७ - माझ्यावर निशाणा साधायचा आहे मात्र माझ्याऐवजी माझा मुलगा कार्ती चिदंबरमवर निशाणा साधला जात असल्याचा आरोप पी चिदंबरम यांनी केला आहे. कार्ती चिदंबरम यांनी बेकायदेशीररित्या जमवलेल्या संपत्तीच्या आरोपावर उत्तर देताना पी चिदंबरम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. कार्ती चिदंबरमविरोधात केलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा पी चिदंबरम यांनी केला आहे.
कार्ती चिदंबरम यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप जर सरकार करत असेल तर त्यांनी त्या संपत्तीची यादी करावी. कार्ती चिदंबरम स्वच्छेने ती संपत्ती सरकारच्या नावे करेल, सरकारला त्या संपत्तीचं मालक होऊ दे असं पी चिदंबरम बोलले आहेत. काही दिवसांपुर्वी प्रसारमाध्यमांमध्ये कार्ती चिदंबरमने गैरव्यवहार करत कोटींची संपत्ती जमा केल्याच्या बातम्या आल्या होत्या. या सर्व बातम्या जाणुनबुजून पेरल्या गेल्या होत्या असा आऱोप पी चिदंबरम यांनी केला आहे.
माझ्या कुटुंबाच्यावतीने मी हे सांगत आहे. कार्ती माझा मुलगा असल्याने टार्गेट केलं जात आहे, खरा टार्गेट मी आहे. यामागचा राजकीय हेतू आणि हे आरोप करण्यासाठी ही वेळ का निवडली हे मी समजू शकतो. आरोप करणा-यांच मला दुख: वाटत. सत्य बाहेर येईल असं पी चिदंबरम यांनी म्हणल आहे. कार्ती चिदंबरम यांनी कोणताच गैरव्यवहार केला नसून सर्व संपत्ती जाहीर केलेली आहे, त्यांनी सर्व नियम पाळले आहेत. आरोप केल्याप्रमाणे त्यांनी कोणतीच संपत्ती लपवून ठेवलेली नाही असं चिदंबरम यांनी स्पष्ट केलं आहे.
काही दिवसांपुर्वी एअरसेल - मॅक्सिस घोटाळ्याच्या तपासादरम्यान अंमलबजावणी संचलनालय आणि आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे कार्ती चिदमंबरम यांच्याकडे कोटींची मालमत्ता असल्याची माहिती समोर आली होती. रिअल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक तसंच जगभरात केलेल्या आर्थिक व्यवहारांच्या आधारे त्यांनी ही मालमत्ता उभी केल्याची माहिती मिळाली होती