बेळगावात पोलीस-शिवसेना नेत्यांत शाब्दिक चकमक
By admin | Published: August 2, 2014 03:36 AM2014-08-02T03:36:42+5:302014-08-02T03:36:42+5:30
येळ्ळूरप्रकरणी भूमिका मांडण्यासाठी बेळगावला आलेल्या शिवसेना नेते आमदार दिवाकर रावते आणि आमदार सुजित मिणचेकर यांना बेळगावात पत्रकार परिषद घेण्यास कर्नाटक पोलिसांनी अटकाव केला
बेळगाव : येळ्ळूरप्रकरणी भूमिका मांडण्यासाठी बेळगावला आलेल्या शिवसेना नेते आमदार दिवाकर रावते आणि आमदार सुजित मिणचेकर यांना बेळगावात पत्रकार परिषद घेण्यास कर्नाटक पोलिसांनी अटकाव केला. यावेळी रावते आणि मिणचेकर यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. यानंतर दोन्ही आमदारांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिनोळी येथे प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून कर्नाटक सरकारच्या पुतळ्याचे दहन केले .
शुक्रवारी सकाळी बेळगावमधील एका हॉटेलमध्ये शिवसेनेच्या नेतेमंडळींची पत्रकार परिषद होती. पत्रकार परिषदेला प्रारंभ झाल्यावर लगेचच टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरिश्चंद्र्र हे फौजफाट्यासह तेथे दाखल झाले. त्यांनी रावते, मिणचेकर आणि इतरांना पत्रकार परिषद घेण्यास कर्नाटक पोलीस कायदा कलम ३५ (१) (ई ) अन्वये प्रतिबंध केला. यावेळी नेत्यांत आणि पोलीस अधिकाऱ्यांत शाब्दिक चकमक झडली.
कोल्हापूर ‘बंद’चा प्रयत्न
कोल्हापूर : आमदार दिवाकर रावते यांना शुक्रवारी येळ्ळूरमध्ये येण्यास कर्नाटक पोलिसांनी मज्जाव केला. या घटनेच्या निषेथार्थ शुक्रवारी शिवसेनेच्यावतीने कोल्हापूर ‘बंद’चे आवाहन करण्यात आले होते. दुचाकीवरून आवाहन करत जाणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने ‘बंद’चा प्रयत्न अयशस्वी झाला.
याप्रकरणी याप्रकरणी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह २७ हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व नंतर त्यांची सुटका केली. (वृत्तसंस्था)