Belgaum Election : 'दादागिरी'चा अधिकार आमच्याकडं, बेळगावच्या सभेतून संजय राऊतांचे मोदींना चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 22:33 IST2021-04-14T22:33:08+5:302021-04-14T22:33:44+5:30
बेळगावबद्दल बोलताना, काँग्रेसने, पंडीत नेहरुंनी चूक केलीय, तुम्ही दुरुस्त करा. त्या काश्मीरमध्ये पंडित नेहरुंनी कलम 370 लावले, ती चूक तुम्ही दुरूस्त केलीच ना. मग, ही चूकही तुम्ही दुरूस्त करा, असे आवाहन खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे

Belgaum Election : 'दादागिरी'चा अधिकार आमच्याकडं, बेळगावच्या सभेतून संजय राऊतांचे मोदींना चॅलेंज
मुंबई - बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी संजय राऊतबेळगावमध्ये दाखल आले होते. बेळगावमधील प्रचारसभेत राऊत यांनी तुफान फटकेबाजी करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जबरी टीका केली. पण, सभा होण्याआधीच बेळगाव प्रशासनाकडून सभेला विरोध करत व्यासपीठ आणि साऊंड सिस्टमची मोडतोड करण्यात आली होती. खुद्द संजय राऊत यांनी या घटनेसंदर्भात ट्विट केलं आणि बेळगाव प्रशासनाला कडक शब्दात इशारा देखील दिला. त्यानंतर, मोठ्या गर्दीत राऊत यांची जाहीर सभा पार पडली.
"बेळगावात उतरलोय. कर्नाटक सरकारकडून दडपशाहीला सुरुवात. संयुक्त महाराष्ट्र चौकातील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले..सभा होणारच! गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही. ही अस्मितेची लढाई झालीय", असा रोखठोक इशारा संजय राऊत यांनी ट्विटमधून दिला होता. त्यानंतर, आयोजित सभेत बोलताना थेट पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारलाच दम भरला.
बेळगावबद्दल बोलताना, काँग्रेसने, पंडीत नेहरुंनी चूक केलीय, तुम्ही दुरुस्त करा. त्या काश्मीरमध्ये पंडित नेहरुंनी कलम 370 लावले, ती चूक तुम्ही दुरूस्त केलीच ना. मग, ही चूकही तुम्ही दुरूस्त करा, असे आवाहन खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे. तसेच, माझं आणि कर्नाटक सरकारचं भांडण नाही, कारण त्यांच्या हातातच काही नाही. ज्यांचं मुख्यमंत्रीपद ते ठरवतात त्यांच्या हातात काय आहे, हा लढा केंद्र सरकारशी आहे. तुम्ही न्यायाची बाजू घेत असाल तर, मराठी जनतेचं, मराठी अस्मीतेचं, महाराष्ट्राच्या एकीकरणाचं हे विराट दर्शन पाहा, असे म्हणत राऊत यांनी बेळगावमधील गर्दीकडे हात दाखवून लक्ष वेधलं. तसेच, लोकशाही मानत असाल तर न्याय द्या.
मी मगाशी फार चांगल्या घोषणा ऐकत होतो, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी. नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी. नाहीच चालणार, दादागिरीचा अधिकार आमच्याकडंय. आमचा जन्मच त्यासाठी झालाय शिवसेनेचा. तानाशाही तुम्ही काय करताय, आम्ही हिटलरचे बाप आहोत, बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्राने मनात आणलं, नाक दाबायचं ठरवलं तर तडफड होईल, असे म्हणत राऊत यांनी मोदींवर जबरी टीका केली.