बेळगाव आता एसआयटीच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 04:39 AM2018-06-22T04:39:00+5:302018-06-22T04:39:00+5:30
कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार आणि पुरोगामी विचारांच्या नेत्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट बेळगाव येथेच शिजल्याचा अंदाज आहे.
बेळगाव : कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार आणि पुरोगामी विचारांच्या नेत्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट बेळगाव येथेच शिजल्याचा अंदाज आहे. यासाठी आरोपी परशुराम वाघमारे याला घेऊन एसआयटीचे पथक बेळगावला आले आहे.
गौरी लंकेश यांची हत्या आपणच केली आणि यासाठी बंदूक चालवण्याचे बेळगाव येथे प्रशिक्षण घेतले, अशी कबुली अटकेतील आरोपी परशुराम याने दिली. यावरून एसआयटीच्या अधिकाऱ्यांना बेळगाव आणि परिसरातील काही हिंदुत्ववादी संघटनांवर संशय आहे. त्यादृष्टीने गुप्तपणे तपास सुरू आहे. डीएसपी दर्जाच्या अधिकाºयाच्या नेतृत्वात हा तपास सुरू असून याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.
बेळगाव जवळील जंगलात एअरगनमधून ५०० गोळ्या झाडून प्रशिक्षण दिले गेल्याचे परशुरामने पोलीस तपासात कबूल केले होते. ती जागा कोणती? यात स्थानिक हिंदुत्ववादी संघटनेचा सहभाग होता का? याचा तपास एसआयटी करत आहेत, अशी माहिती मिळाली आहे.