बेळगावचे तहसीलदार मण्णीकेरी यांचा मृत्यू संशयास्पद?, कुटुंबीयांनी केली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 12:48 PM2023-06-30T12:48:37+5:302023-06-30T12:49:08+5:30
घातपाताचा संशय
बेळगाव : बेळगाव प्रांताधिकारी कार्यालयाचे तहसीलदार अशोक मण्णीकेरी यांचा मृत्यू वादाच्या भोवऱ्यात अडकला असून त्यांचा मृत्यू संशयास्पद झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. बेळगावच्या प्रांताधिकारी कार्यालयाचे तहसीलदार अशोक मण्णीकेरी यांचे बुधवारी (दि. २८ जून) मध्यरात्री निधन झाले. त्यानंतर त्यांचा मृत्यू हा नैसर्गिकरीत्या झाला नसून संशयास्पदरीत्या झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्रपरिवाराने केली आहे. याबाबत कॅम्प पोलिस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
अशोक मण्णीकेरी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, पाच बहिणी असा मोठा परिवार आहे. मण्णीकेरी यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या नातेवाइकांनी आणि समर्थकांनी कॅम्प पोलिस स्थानकासमोर मोठी गर्दी केली होती. यादरम्यान मण्णीकेरी यांचे मेव्हणे आणि पत्नीवर हल्ल्याचाही प्रयत्न झाला आहे. मण्णीकेरी यांची मोठी बहीण गिरीजा यांनी अशोक मण्णीकेरी यांचा मृत्यू संशयास्पद झाल्याची तक्रार नोंदविली असून घातपाताचा संशयही व्यक्त केला आहे. त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून पोलिस तपासाअंती मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
अशोक मण्णीकेरी हे मनमिळावू अधिकारी म्हणून परिचित होते. बेळगाव शहरात महसूल खात्यासंदर्भातील विविध अडीअडचणीत त्यांनी अनेकांना मदत केली आहे. शहरातील विविध क्षेत्रात त्यांचा मोठा जनसंपर्क होता.