‘कोट्यवधींची श्रद्धा हाच माझ्या जन्मस्थानाचा पुरावा’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 02:04 AM2019-08-08T02:04:58+5:302019-08-08T06:26:38+5:30

श्रीरामाच्या वतीने सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

'Belief of billions is proof of my birthplace' | ‘कोट्यवधींची श्रद्धा हाच माझ्या जन्मस्थानाचा पुरावा’

‘कोट्यवधींची श्रद्धा हाच माझ्या जन्मस्थानाचा पुरावा’

Next

नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त जागा हेच माझे जन्मस्थान आहे, याला या देशातील कोट्यवधी भाविकांची निस्सीम श्रद्धा हा सबळ पुरावा आहे, असा युक्तिवाद ‘रामलल्ला विराजमान’ देवतेच्या वतीने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला.

रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या २.७७ एकर वादग्रस्त जमिनीच्या मालकीच्या वादातून केलेल्या अपिलांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विशेष घटनापीठापुढे दुसऱ्या दिवशीही सुनावणी सुरू राहिली. वादग्रस्त जागेवर कित्येक शतकांच्या कब्जे वहिवाटीने हक्क सांगणाºया ‘निर्मोही आखाडा’ या पक्षकाराचा मंगळवारी अपूर्ण राहिलेला युक्तिवाद पूर्ण झाल्यावर श्री रामलल्लाच्या वतीने ज्येष्ठ वकील के. पराशरन यांनी युक्तिवाद केला.

त्यांनी सांगितले की, रामजन्मभूमी हेच हिंदूंसाठी भगवान श्रीरामाचे मूर्तिमंत रूप व श्रद्धास्थान आहे. हजारो वर्षांपूर्वी झालेल्या श्रीरामाच्या जन्माचे ठिकाण नेमके हेच आहे, याचा याहून वेगळा पुरावा तरी कसा देता येईल? श्रीरामाचा जन्म अयोध्येत झाला याचे दाखले वाल्मिकी रामायणात तीन ठिकाणी मिळतात.

लोकांची श्रद्धा हा कायद्याने ग्राह्य पुरावा होऊ शकतो का? येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहॅममध्ये झाल्याचे भाविक मानतात. पण खरंच तसे आहे का, हा मुद्दा एखाद्या न्यायालयात उपस्थित होऊन त्यात श्रद्धेचा पुरावा दिला गेला आहे का, असा सवाल खंडपीठावरील न्या. शरद बोबडे यांनी केला. त्यावर पराशरन यांनी, ‘लगेच सांंगता येणार नाही. शोध घेऊन सांगेन’, असे उत्तर दिले. अयोध्याच श्रीरामाचे जन्मस्थान मानले जाते, यावर पराशरन जोर देत होते तेव्हा न्यायालयाने विचारले की, तेथील मूर्ती किती जुन्या आहेत, हे ठरविण्यासाठी ‘कार्बन डेटिंग’ तंत्राचा कोणी उपयोग केला आहे का?

बाबरी मशिदीची वादग्रस्त वास्तू ६ डिसेंबर १९९२ रोजी उद्ध्वस्त करण्याच्या कित्येक वर्षे आधी तिथे श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यासंबंधी न्यायमूर्तींनी बारकाईने विचारलेल्या प्रश्नांवर पराशरन म्हणाले की, मूर्तीची प्रतिष्ठापना करणे चूक होते की बरोबर हे आधी मंदिर होते की मशीद यावर ठरवावे लागेल. तेथे मूर्ती ठेवणे चूक होते व ती चूक कायम राहिली हे वादासाठी मान्य केले तरी न्यायालयाने हस्तक्षेप करून वादग्रस्त जागा ‘रिसिव्हर’च्या ताब्यात दिली, तेव्हा कथित चूक पुसली गेली. न्यायालयाने नेमलेल्या ‘रिसिव्हर’ने घेतलेला ताबा हे चूक पुढे सुरू ठेवणे असू शकत नाही. रामलल्लाच्या वतीने दावा केला की, वादग्रस्त वास्तू मंदिर होते की मशीद याचा निर्णय तेथे कोणत्या धर्माची उपासना चालायची यावरून केला जाऊ शकतो. त्यादृष्टीने निर्णय मशिदीच्या बाजूने होऊ शकत नाही, कारण तेथे आजही मूर्ती आहेत.

पुरावे चोरीला!
वादग्रस्त वास्तूवर कब्जे वहिवाटीने हक्क सांगणाऱ्या ‘निर्मोही आखाड्या’स न्यायालयाच्या सरबत्तीस सामोरे जावे लागले. न्यायालयाने आखाड्याचे ज्येष्ठ वकील निर्मलकुमार जैन यांना सांगितले की, तुम्ही कित्येक शतकांच्या वहिवाटीचा हक्क सांगता, मग त्याच्या महसुली दप्तरात नोंदी असतील तर त्या दाखवा.
जैन म्हणाले की, मूळ दाव्यात आम्ही सादर केलेल्या पुराव्यांचा ऊहापोह उच्च न्यायालयाच्या निकालपत्रात केला आहे. त्याआधारे मी ते दाखवू शकतो.
नंतर जैन यांनी १९८२ मध्ये पडलेल्या दरोड्यात सर्व रेकॉर्ड चोरीला गेल्याने आम्ही कागदोपत्री पुरावा दाखवू शकत नाही, असे सांगितले. त्यावर न्यायालयाने त्यांना शोध घ्या, तयारी करा, असे सांगून पुढील पक्षकाराच्या वकिलास युक्तिवाद सुरू करण्यास सांगितले.

Web Title: 'Belief of billions is proof of my birthplace'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.