रक्ताच्या पेंटिंगने प्रेयसी खूष, पण आली बंदी; तामिळनाडूत सुरक्षिततेसाठी घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 11:04 AM2023-01-10T11:04:46+5:302023-01-10T11:05:06+5:30
चेन्नईतील गणेशन या २० वर्षीय युवकाने १० डिसेंबर रोजी वाढदिवसाला प्रेयसीला आगळी भेट दिली.
चेन्नई : शरीरातील रक्त काढून त्याद्वारे चित्र काढण्यावर तामिळनाडू सरकारने बंदी घातली आहे. अशा प्रकारची चित्रे काढण्याच्या प्रकारांमध्ये या राज्यात वाढ झाली होती. त्यामुळे मानवी आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी सदर निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सरकारने सांगितले.
चेन्नईतील गणेशन या २० वर्षीय युवकाने १० डिसेंबर रोजी वाढदिवसाला प्रेयसीला आगळी भेट दिली. त्यासाठी तो एका ब्लड आर्ट स्टुडिओत गेला होता. तिथे त्याच्या शरीरातील रक्त काढण्यात आले. या रक्ताने त्याच्या प्रेयसीचे चित्र चित्रकाराने काढले. गणेशनने ते चित्र भेट देताच प्रेयसी खूश झाली. मात्र, ही घटना समोर येताच तामिळनाडूत खळबळ माजली. (वृत्तसंस्था)
एकाच नीडलचा वापर अनेक जणांसाठी
शरीरातून रक्त घेण्याची एक शास्त्रीय पद्धत असते. त्याचा अवलंब ब्लड आर्ट स्टुडिओमध्ये होत नाही. इतकेच नव्हे एकच नीडल अनेक लोकांच्या शरीरातील रक्त काढून घेण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे एचआयव्ही, हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी आदी आजार होण्याची शक्यता असते.
चुकीच्या पद्धतीने रक्त घेतले जाते
एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून रक्ताचा नमुना घेण्याची परवानगी फक्त प्रयोगशाळेतील प्रशिक्षित कर्मचारीवर्ग, नर्स, डॉक्टर आदींना असते. चुकीच्या पद्धतीने शरीरातून रक्त काढण्यामुळे माणसाच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
गेल्या २८ डिसेंबर रोजी त्या राज्याचे आरोग्यमंत्री एम. ए. सुब्रमण्यम यांनी चेन्नईतील एका ब्लड आर्ट स्टुडिओला अचानक भेट दिली. तिथे त्यांना रक्त भरलेल्या काही बाटल्या व नीडल्स आढळून आल्या. मानवी आरोग्यासाठी धोकादायक असलेले ते दृश्य पाहून सुब्रमण्यम यांनी राज्यातील ब्लड आर्ट स्टुडिओवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
कडक कारवाईचा इशारा : सुब्रमण्यम
आपल्या रक्ताद्वारे चित्र काढणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कडक शिक्षा केली जाईल, असेही तामिळनाडूचे आरोग्यमंत्री एम. ए. सुब्रमण्यम यांनी जाहीर केले. त्यांनी सांगितले की, रक्ताद्वारे चित्र काढणे हा शिक्षापात्र गुन्हा आहे. रक्तदान हे पवित्र कार्य आहे. मात्र, अन्य कारणांसाठी शरीरातील रक्त काढणे अयोग्य आहे. एखाद्याविषयी आदर किंवा प्रेमभाव दर्शविण्यासाठी अनेक उत्तम मार्ग उपलब्ध आहेत.