'बंगाल बंद'दरम्यान तणाव, भाजप नेत्यावर गोळीबार, समर्थक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 11:23 AM2024-08-28T11:23:57+5:302024-08-28T11:25:21+5:30

Bengal Bandh : सचिवालयावर मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ भाजपने आज १२ तासांच्या बंदची हाक दिली आहे.

bengal bandh firing on bjp leader bhatpara supporter injured west-bengal bandh kolkata doctor rape murder case | 'बंगाल बंद'दरम्यान तणाव, भाजप नेत्यावर गोळीबार, समर्थक जखमी

'बंगाल बंद'दरम्यान तणाव, भाजप नेत्यावर गोळीबार, समर्थक जखमी

Bengal Bandh : कोलकाता येथील आरजी कर हॉस्पिटलमध्ये ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणावरून पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेला रोष थांबण्याचं नाव घेत नाही. या घटनेच्या निषेधार्थ मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत मंगळवारी मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाला 'नबन्ना प्रोटेस्ट' असं नाव देण्यात आलं होतं. दरम्यान, यावेळी पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार केला. तसंच, नबन्ना प्रोटेस्टचा आयोजक सयान लाहिडी यालाही अटक केली. मात्र, यानंतरही आज हे आंदोलन सुरू आहे.

दुसरीकडे, राज्य सचिवालयावर मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ भाजपने आज १२ तासांच्या बंदची हाक दिली आहे. या बंगाल बंद दरम्यान हिंसाचाराच्या बातम्या समोर येत आहेत. अनेक ठिकाणी भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचं म्हटलं जात आहे. भाटपारा येथे बंगाल बंददरम्यान भाजपच्या नेत्यावर गोळीबार झाल्याचं सांगण्यात येत आहे. भाटपारा येथील भाजप नेते प्रियंगू पांडे यांच्या कारवर सहा राऊंड गोळीबार करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते अर्जुन सिंह यांनी केला आहे. या गोळीबारात कारमधून प्रवास करणारा भाजप समर्थक जखमी झाला. भाजप समर्थकाचं नाव रवी सिंह असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, बंगाल बंदमुळं राज्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी भाजप आणि तृणमूल काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याचं वृत्त आहे. राजधानी कोलकातामध्ये सकाळपासूनच रस्त्यांवर गर्दी कमी आहे. रस्त्यांवर फार कमी बसेस, रिक्षा, टॅक्सी दिसतात. खासगी वाहनांची संख्याही कमी आहे. मात्र, बाजारपेठा आणि दुकानं पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत. शाळा-महाविद्यालये सुरू आहेत पण बहुतांश खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती खूपच कमी आहे, कारण त्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे.

याचबरोबर, भाजपाच्या बंगाल बंदमध्ये मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. यादरम्यान, कोलकाता येथील श्यामबाजार मेट्रो स्टेशनचे गेट भाजपा कार्यकर्त्यांनी जबरदस्तीनं बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सात जणांना अटक केली आहे. तसंच अलीपुरद्वारमध्ये आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. याशिवाय, बंगालमधील उत्तर दिनाजपूरमध्ये भाजपाच्या बंगाल बंददरम्यान जाळपोळ झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचवेळी मुर्शिदाबादमध्ये भाजपा समर्थकांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याने गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

Web Title: bengal bandh firing on bjp leader bhatpara supporter injured west-bengal bandh kolkata doctor rape murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.