झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 04:37 PM2024-05-25T16:37:49+5:302024-05-25T16:39:37+5:30
Lok Sabha Elections 2024: काही मतदान केंद्रांवर भाजपा एजंट्सना प्रवेश दिला जात नसल्याच्या तक्रारी पाहता प्राणनाथ टुडू हे गडवेटाला जात असताना ही घटना घडली.
पश्चिम बंगालमधील झारग्राम लोकसभा मतदारसंघात मतदानादरम्यान भाजपा उमेदवार प्राणनाथ टुडू यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, प्राणनाथ टुडू यांच्या गाडीवर विटा फेकण्यात आल्या. तसेच, केंद्रीय सुरक्षा दलांवरही हल्ला झाल्याचा आरोप आहे. गडबेटा येथे प्राणनाथ टुडू यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यात दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. तर त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने आरोप केला आहे की, भाजपा परिसरात अशांतता पसरवत आहे.
काही मतदान केंद्रांवर भाजपा एजंट्सना प्रवेश दिला जात नसल्याच्या तक्रारी पाहता प्राणनाथ टुडू हे गडवेटाला जात असताना ही घटना घडली. अचानक काही लोकांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान काही टीएमसीच्या गुंडांनी गाडीवर विटा फेकण्यास सुरुवात केली, असा दावा प्राणनाथ टुडू यांनी केला. यावेळी त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता ते जखमी झाले. त्यांच्यासोबत असलेल्या दोन सीआयएसएफ जवानांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले, असे प्राणनाथ टुडू यांनी सांगितले.
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त परिसरात पाठवण्यात आला होता. दुसरीकडे, याबाबत स्थानिक टीएमसी नेतृत्वाने आरोप नाकारले आणि प्राणनाथ टुडू यांच्यावर "शांततापूर्ण मतदान प्रक्रिया बिघडवण्याचा" प्रयत्न केल्याचा आरोप केला. स्थानिक टीएमसी नेत्याने सांगितले की, भाजपाचे उमेदवार मतदारांना धमकावत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी आंदोलन केले. दरम्यान, जमावाकडून विविध माध्यमांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Watch: Massive stone pelting occurred against Jhargram BJP candidate Pranat Tudu in Garbeta. A car was vandalized, and security personnel were injured. After five phases of relatively calm polling, violence marred the sixth phase in Bengal. pic.twitter.com/thrv31nJSW
— IANS (@ians_india) May 25, 2024
भाजपा उमेदवाराच्या विरोधात 'गो बॅक'च्या घोषणा
मोगलापाटा हे गाव झारग्रामच्या गडवेटा विधानसभा मतदारसंघात आहे. प्राणनाथ टुडू या परिसरात येताच जवळपास दीड ते दीडशे ग्रामस्थांनी त्यांना घेराव घातला आणि गो बॅकच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर अचानक विटा आणि दगडफेक करण्यात आली. परिस्थिती इतकी गुंतागुंतीची बनली की, प्राणनाथ टुडू यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनाही ती हाताळता आली नाही.