Bengal Municipal Election Result 2022: पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचा वारू उधळला; नगरपालिका निवडणुकीत मोठी आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 12:09 PM2022-03-02T12:09:54+5:302022-03-02T12:11:17+5:30
West Bengal Municipal Election Result: राज्यातील १०७ नगरपालिकांसाठी गेल्या महिन्यात मतदान झाले. यामध्ये ७७ टक्के मतदान झाले होते. या काळात पत्रकारांवर देखील हल्ले झाले होते.
पश्चिम बंगालमध्ये १०७ नगरपालिकांमध्ये झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी सुरु झाली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाने भाजपावर बहुतांश नगरपालिकांमध्ये मात केल्याचे चित्र आहे. टीएमसीने मोठी आघाडी घेतली असून राज्य निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने १२ नगरपालिकांमध्ये विजय मिळविला आहे. तर ३४ नगरपालिकांमध्ये तृणमूल आघाडीवर आहे.
भाजपाने या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गोंधळ आणि हिंसाचाराचा आरोप केला होता. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार १२ नगर पालिका टीएमसीच्या ताब्यात गेल्या आहेत. यामध्ये बीरभूम आणि कुचबेहर जिल्ह्यातील दहा नगरपालिका आहेत. टीएमसी आणखी ३४ नगरपालिकांमध्ये आघाडीवर आहे. टीएमसीला मेखलीगंज, माथाबंगा, रघुनाथपुरमध्ये विजय मिळाला आहे.
राज्यातील १०७ नगरपालिकांसाठी गेल्या महिन्यात मतदान झाले. यामध्ये ७७ टक्के मतदान झाले होते. या काळात पत्रकारांवर देखील हल्ले झाले होते. भाजपाने निवडणुकाच रद्द करण्याची मागणी करत सोमवारी १२ तासांचे राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. टीएमसीने निवडणुकीवेळी हिंसाचार केला, मतदानावेळी मतदान केंद्रांवर मोठा घोळ घातल्याचा आरोप केला आहे.