नबन्ना प्रोटेस्टच्या आयोजकाला बंगाल पोलिसांनी केली अटक, भाजपाच्या ‘बंगाल बंद’ला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 09:15 AM2024-08-28T09:15:24+5:302024-08-28T09:18:20+5:30
West Bengal Nabanna Protest Updates: कोलकाता येथील आरजी कर रुग्णालयात एका ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेविरोधात नबन्ना प्रोटेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केलं होतं. दरम्यान, या नबन्ना प्रोटेस्टचा आयोजक अससलेला विद्यार्थी नेता सयान लाहिडी याला अटक करण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांचं आंदोलन आजही सुरू आहे.
कोलकाता येथील आरजी कर रुग्णालयात एका ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणावरून बंगालमध्ये निर्माण झालेला रोष थांबण्याचं नाव घेत नाही आहे. मंगळवारी कोलकात्यामध्ये नबन्ना प्रोटेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केलं होतं. दरम्यान, या नबन्ना प्रोटेस्टचा आयोजक अससलेला विद्यार्थी नेता सयान लाहिडी याला अटक करण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांचं आंदोलन आजही सुरू आहे.
तसेच आज भाजपाने १२ तासांच्या बंगाल बंदचं आयोजन केलं आहे. भाजपाने बोलावलेल्या बंगाल बंदविरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज बंगालमध्ये कुठलाही बंद राहणार नाही. तसेच सरकारी कर्मचारी कार्यालयात आले नाहीत, तर त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, असे सांगितले.
भाजपाच्या बंगाल बंदला सुरुवात झाली असताना भाजपा नेत्या अग्निमित्रा पॉल यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली आहे. ममता बॅनर्जी सरकारची भूमिका खूपच वाईट आहे. राज्यातील पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केली आहे. त्यांनी रसायनं मिसळून आंदोलकांवर त्याची फवारणी केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार महिलांना संरक्षण देण्यास अपयशी ठरलं आहे. आमचं आंदोलन सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
तर भाजपा नेते सुकांत मजुमदार यांनी नबन्ना प्रोटेस्टमध्ये सहभागी झाल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना मुक्त करण्याची मागणी केली आहे. या संबंधात त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. मजुमदार यांनी सांगितले की, हा बंद हुकूमशाहीविरोधात आवश्यक आहे. ममता सरकार न्यायासाठी जनता करत असलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.