बंगाल : तृणमूल काँग्रेसला राज्यात पर्याय नाही, कोणत्याही पक्षानं जागा घेणं अशक्य - ममता बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 09:15 PM2021-02-04T21:15:45+5:302021-02-04T21:18:56+5:30
ममता बॅनर्जींनी केला भाजपवर हल्लाबोल
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला कोणताही पर्याय नाही. तसंच कोणताही राज्यात याचं स्थान घेऊ शकत नाही. तृणमूल काँग्रेसला केवळ तृणमूल काँग्रेस हाच एक पर्याय आहे," असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पुढील काही दिवसांमध्ये पश्चिम बंगालच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशा परिस्थितीत आतापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या बैठकीदरम्यान कोणताही पक्ष आपल्या पक्षाची जागा घेऊ शकत नाही आणि तृणमूल काँग्रेसनं जनतेच्या हिताची कामं करणारं जागातील चांगलं सरकार दिल्याचंही त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. "भाजपनं सोनार भारत संपवला आणि आता ते सोनार बांगलाची गोष्ट करत आहेत. भगवा दल सोशल मीडियाच्या माध्यमातून दुष्प्रचार करत आहे. अम्फान चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी आम्ही शक्य ती मदत केली. परंतु एक दोन गोष्टींसाठी आम्हाला टीकेचा सामना करावा लागला," असंही बॅनर्जी म्हणाल्या.
#WATCH: "Alternative of TMC is only TMC. Nobody else. They (BJP) want riots, we want peace...That is why our slogan is 'Chahi na chahi na BJP ke chahi na. Chahi na chahi na danga chahi na. Chahi na chahi na lootera chahi na. Chahi na chahi na bhrashtachar chahi na...", says WB CM pic.twitter.com/XOPFiBl92g
— ANI (@ANI) February 4, 2021
"भाजपनं देश विकला आहे आणि पश्चिम बंगालवर नजर टाकण्यापूर्वी त्यांनी आरसा पाहिला पाहिजे. केंद्र सरकारनं सीएए कायदा मागे घेतला पाहिजे. याचं अस्तित्व देशाच्या नागरिकांसाठी धोक्याचं आहे," असा दावाही त्यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये या वर्षी एप्रिल महिन्याच्या जवळपास विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरिस किंवा मार्च महिन्याच्या सुरूवातीला निवडणूक आयोगाद्वारे निवडणुकांची घोषणा केली जाऊ शकते. निवडणुकांपूर्वी अनेकांनी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.