भाजपला टक्कर देण्यासाठी तृणमूलनं बदलली रणनीती; राज्य वाचवू शकणार का ममता दीदी?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 04:23 AM2019-12-30T04:23:33+5:302019-12-30T06:58:11+5:30

मावळत्या वर्षातील मोठा बदल; बदलत्या राजकारणात ममता बॅनर्जींचा नवा पवित्रा

Bengali Assamist party becomes the grassroots party for the BJP | भाजपला टक्कर देण्यासाठी तृणमूलनं बदलली रणनीती; राज्य वाचवू शकणार का ममता दीदी?

भाजपला टक्कर देण्यासाठी तृणमूलनं बदलली रणनीती; राज्य वाचवू शकणार का ममता दीदी?

Next

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपने तृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडारे पाडली हा या राज्याच्या राजकारणातील यंदाच्या वर्षातला सर्वात मोठा बदल आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यावर सर्वसमावेशकतेची भूमिका बाजूला ठेवून बंगाली अस्मितेचा उदोउदो करीत राजकारण करायची पाळी आली आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगालमध्ये केवळ दोन जागा जिंकता आलेल्या भाजपने २०१९ च्या निवडणुकांत त्या राज्यातील ४२ पैकी १८ जागांवर विजय मिळविला. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याची आस असलेल्या तृणमूल काँग्रेसला या पराभवामुळे आपली भूमिका बदलणे भाग पडले.

तृणमूल काँग्रेसला २२ जागांवर विजय मिळाला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जिंकलेल्या जागांच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकांत तृणमूल काँग्रेसला लोकसभेच्या १२ जागा गमवाव्या लागल्या. या निवडणुकांत राज्यामध्ये भाजप, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमकीही झाल्या. राज्यात भाजपचा वाढता प्रभाव पाहून अस्वस्थ झालेल्या ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकांत पक्षाची कामगिरी उत्तम व्हावी यासाठी आखणी सुरू केली आहे. त्यांच्या सरकारने विविध नव्या योजनांची अंमलबजावणी सुरू केली. याचाच भाग म्हणून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता बंगाली अस्मितेचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. बदलत्या राजकारणात ममता बॅनर्जी कोणता निर्णय घेणार ते आगामी काळात दिसणार आहे. (वृत्तसंस्था)

एनआरसी, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध
देशभरात हिंदी भाषा सर्वात जास्त बोलली जात असल्याचा उल्लेख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता. एक देश एक भाषा या सूत्राचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुरस्कार केला होता. हिंदी भाषा देशाच्या एकात्मतेत महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असेही ते म्हणाले होते.

त्याला दक्षिण भारतातील राज्यांबरोबरच ममता बॅनर्जी यांनीही विरोध केला. केंद्र सरकारने हिंदी भाषा बंगाली जनतेवर लादली आहे, असा प्रचार तृणमूल काँग्रेसने सुरू केला. त्यावर शहा यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे म्हटले होते.

माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांची बीसीसीआयच्या प्रमुखपदी तसेच अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रासाठी मिळालेले नोबेल हा बंगाली लोकांसाठी अभिमानाचा क्षण आहे, असे ममता बॅनर्जी यांनी आवर्जून सांगितले होते.

आसाममध्ये राबविण्यात येणारी एनआरसी योजना तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ममता बॅनर्जी ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. जाहीर सभा घेतल्या. त्यामध्ये भाजप हा बंगालीविरोधी पक्ष आहे, असे आवर्जून सांगितले.

Web Title: Bengali Assamist party becomes the grassroots party for the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.