बंगालमधील घबाड दाऊदचे?
By Admin | Published: September 27, 2015 05:54 AM2015-09-27T05:54:24+5:302015-09-27T05:54:24+5:30
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) व ईडीने कोलकाता व सिलिगुडी येथे गेले दोन दिवस टाकलेल्या धाडींमध्ये हवाल्याची ८० कोटी रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून
कोलकाता : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) व ईडीने कोलकाता व सिलिगुडी येथे गेले दोन दिवस टाकलेल्या धाडींमध्ये हवाल्याची ८० कोटी रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून, हवाला दलालांमार्फत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला हा पैसा पुरविण्यात येत होता, अशी धक्कादायक माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. अजूनही
धाडसत्र सुरूच असल्याने हा आकडा वाढू शकतो. दरम्यान, या प्रकरणातील एक
मुख्य आरोपी एस. नागार्जुन याला अटक करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालची राजधानी आणि आजूबाजूच्या परिसरात गुरुवारी पहाटे हे धाडसत्र सुरू करण्यात आले. या रॅकेटचे धागेदोरे तामिळनाडूशी जुळले असल्याचेही सांगितले जाते. सूत्रांनुसार धाडीत जप्त करण्यात आलेला हा पैसा हवालाच्या माध्यमाने दुबईला पाठविण्यात येणार होता.
कोलकात्यात दोन ठिकाणी १६ गोणी, २७ प्रवासी बॅगा आणि २ कपाटांमधून ही रोख रक्कम जप्त करण्यात आली. हा घोटाळा किमान चार हजार कोटी रुपयांचा असावा, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
1 कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जी. सिस्टीम आणि एफपी इंटरप्रायजेस या दोन कंपन्यांच्या परिसरातून धाडीत जप्त करण्यात आलेला पैसा मोजण्यासाठी १०० लोकांची चमू रोख मोजणाऱ्या मशिनसह काम करीत होती.
2एस. नागार्जुन आणि सँटियागो मार्टिन हे दोघे या हवालाकांडाचे मुख्य सूत्रधार आहेत. नागार्जुन मूळचा कोईमतूरचा असून, गेली अनेक वर्षे तो कुटुंबासह कोलकात्यात राहत आहे. मार्टिन दोन वर्षांपूर्वी चेन्नईत सक्तवसुली संचालनालयासमक्ष उपस्थित झाला होता. त्यावेळी त्याच्याजवळून सात कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले होते.
3या कंपन्या बनावट लॉटरी रॅकेटमध्ये सामील होत्या, असा संशय आहे. गैरव्यवहारातून जमा करण्यात आलेला पैसा प्रथम हवालामार्फत दुबईला पाठविण्यात येत होता. तेथून तो पाकिस्तानला जात होता, अशीही माहिती समोर आली आहे.