लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज? इन्स्टाग्रामवरच्या ज्योतिष्याने एका प्रश्नाचे उत्तर देता देता लुटले ६ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:11 IST2025-02-18T17:06:12+5:302025-02-18T17:11:37+5:30

इन्स्टाग्रामवरुन लग्नाची माहिती देताना एका तरुणीची ५.९ लाखांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

Bengaluru 24 year old girl fell into the trap of an astrologer and lost lakhs of rupees | लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज? इन्स्टाग्रामवरच्या ज्योतिष्याने एका प्रश्नाचे उत्तर देता देता लुटले ६ लाख

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज? इन्स्टाग्रामवरच्या ज्योतिष्याने एका प्रश्नाचे उत्तर देता देता लुटले ६ लाख

Crime News: सध्याची तरुणाई ही सोशल मीडियाच्या इतकी आहारी गेलीय की महत्त्वाचे निर्णय देखील त्यांच्याच आधारावर घेण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये इन्स्टाग्राम हे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म सर्वात पुढे आहे. अशा सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर जे दिसतंय तेच खरं आहे असं समजून अनेकजण फसवणुकीला बळी पडत आहे. असाच काहीसा प्रकार बंगळुरुतील एका तरुणीसोबत घडला आहे. इन्स्टाग्रामवर एका ज्योतिषाच्या जाळ्यात अडकून एका तरुणीने तब्बल पाच लाख रुपये गमावले आहेत.

कर्नाटकातील बंगळुरूमध्ये एका २४ वर्षीय तरुणीची भामट्या ज्योतिषाने सुमारे ५.९ लाख रुपयांची फसवणूक केली. तरुणीने ज्योतिषाला माझा प्रेमविवाह होणार आहे की अरेंज्ड मॅरेज अशी विचारणा केली होती. यावर भामट्या ज्योतिषाने तुझा प्रेमविवाह होणार असून त्यासाठी एक पूजा करावी लागेल असं सांगितले होते. या पूजेच्या नावावर ज्योतिषाने तरुणीकडून तब्बल ५.९ लाख रुपये उकळले आहे. 

पीडित तरुणी एका खासगी कंपनीत काम करते. ५ जानेवारी रोजी तरुणीने इंस्टाग्रामवर 'splno1indianastrologer' नावाचे अकाऊंट पाहिले. प्रोफाइलमध्ये एका अघोरी बाबाचा फोटो होता. त्याने बायोमध्ये 'तज्ञ ज्योतिषी' असे लिहिले होते. तरुणीने त्या व्यक्तीला मेसेज केला. त्याने आपले नाव विजय कुमार असल्याचे सांगितले आणि मोबाईल नंबर दिला. त्याने तरुणीने तिची जन्मतारीख आणि नाव व्हॉट्सॲपवर पाठवायला सांगितले जेणेकरुन  तिची कुंडली पाहता येईल.

तरुणीने सगळी माहिती त्या ज्योतिषाला पाठवली. त्यावर विजय कुमारने तुझा प्रेमविवाह होणार आहे पण त्यासाठी तुला एक पूजा करावी लागेल ज्यासाठी १,८२० रुपये खर्च येईल. तरुणीला ही रक्कम फारशी मोठी वाटली नाही, म्हणून तिने होकार दिला. विजय कुमारने तरुणीकडे डिजिटल पेमेंट ॲपद्वारे पैसे मागितले. तरुणीने पुजेसाठी पैसे पाठवले. यानंतर त्याने तरुणीच्या वैवाहिक आयुष्याविषयी आणि भविष्याविषयी वेगवेगळ्या कथा रचायला सुरुवात केली. विजय कुमार वेगवेगळ्या पूजेच्या बहाण्याने तिच्याकडे पैसे मागत राहिला. असं करत करत तरुणीने विजय कुमारला तब्बल ५.९ लाख रुपये दिले. 

त्यानंतर विजय कुमारने आणखी पैसे मागायला सुरुवात केली. मात्र तरुणीला काही तरी चुकीचे घडल्याचे समजलं. त्यामुळे तिने पैसे द्यायला नकार दिला आणि तिचे पैसे परत मागितले. विजय कुमारने तरुणीला फक्त १३ हजार रुपये पाठवले. मात्र तरुणीने आणखी पैसे मागितले तेव्हा त्याने मी आत्महत्या करेल आणि सुसाईड नोटमध्ये तुझे नाव लिहील, अशी धमकी दिली. त्यामुळे तरुणी शांत बसली. यानंतर काही दिवसांनी प्रशांत नावाच्या व्यक्तीने तरुणीला फोन करुन आपण वकील असल्याचे सांगितले. कुमार आत्महत्या करणार आहे कारण तू पूजा करूनही पैसे परत मागत आहे, असं त्या व्यक्तीने सांगून तरुणीला घाबरवायला सुरुवात केली. त्यामुळे तरुणीने पोलिसांकडे जाऊन हा सगळा प्रकार सांगितला.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला तेव्हा यामध्ये कोणताही ज्योतिषी किंवा वकील नसल्याचे समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा आणि बीएनएस कलम ३१८ अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
 

Web Title: Bengaluru 24 year old girl fell into the trap of an astrologer and lost lakhs of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.