बेंगळुरुमध्ये ५ तास वाहतूक कोंडी, शाळेतली मुलं रात्री ९ वाजता घरी पोहचली, नागरिकांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 10:38 AM2023-09-28T10:38:35+5:302023-09-28T11:00:16+5:30
वाहनांचा आवाज आणि तासनतास होणाऱ्या गोंधळामुळे तेथे अडकलेल्या नागरिकांना त्रासदायक झाले होते.
नवी दिल्ली: देशातील आयटी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूमध्ये बुधवारी (२७ सप्टेंबर) संध्याकाळी एवढी मोठी वाहतूक कोंडी झाली होती की संपूर्ण शहर ठप्प झाले होते. एक किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी २ तास लागत होते, म्हणजे किती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती, याचा अंदाज आपण लावू शकतो. शाळेतल्या मुलांना घरी पोहचायला रात्री ८-९ वाजल्याचे पाहायला मिळाले.
वाहनांचा आवाज आणि तासनतास होणाऱ्या गोंधळामुळे तेथे अडकलेल्या नागरिकांना त्रासदायक झाले होते. वाहतूक पोलिसांनाही घाम फुटला. या कोंडीत अनेकांनी सोशल मीडियावर ऑनलाइन येऊन आपल्या समस्या सांगितल्या. नागरिकांनी प्रशासनावरही संताप व्यक्त केला. बेलंदूरमध्ये एक दृश्य समोर आले आहे, ज्यामध्ये वाहतूक इतकी खराब होती की फूटपाथवर दुचाकी धावत होत्या आणि पादचाऱ्यांसाठी जागाच उरली नव्हती.
बेंगळुरू वाहतूक आयुक्त आयपीएस एमएन अनुचेथ यांनी सांगितले की, ते त्यांच्या टीमसोबत ओआरआर (आउटर रिंग रोड) वर होते. यावेळी वाहतूक नेहमीच्या दुप्पट असल्याचे त्यांनी सांगितले. साधारणत: बुधवारी वाहनांची संख्या दीड ते दोन लाख असते. पण, सायंकाळी साडेसातपर्यंत हा आकडा साडेतीन लाखांवर पोहोचला होता. याचं कारण म्हणजे २८ ऑक्टोबरपासून ५ दिवसांची दीर्घ आठवडा सुट्टी असणार आहे. अशा परिस्थितीत लोक बेंगळुरूमधून सुट्टी घालवण्यासाठी बाहेर पडले होते. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडीही झाली.
दक्षिण आफ्रिकेचा स्टँड अप कॉमेडियनही अडकला
दक्षिण आफ्रिकेचा स्टँड अप कॉमेडियन ट्रेव्हर नोव्हाही आऊटर रिंग रोडवर ट्रॅफिक जॅममध्ये अडकला. त्याचा शो बेंगळुरूमध्ये होणार होता पण तो ३० मिनिटे ट्रॅफिकमध्ये अडकला. पूर्णिमा नावाच्या एका ट्विटर युजरने ट्विट केले की, अॅम्ब्युलन्स २० मिनिटे तिच्यासोबत अडकली होती. १५ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ५ तास लागले. कावेरी नदीचे पाणी तामिळनाडूला सोडण्याच्या विरोधात शेतकरी संघटनेने कर्नाटकात बंदची घोषणा केली होती. त्यामुळे बुधवारी सुटीही होती.