गरीब रुग्णांवर 'मोफत अँजिओप्लास्टी', दानशूर डॉक्टरचं परिपत्रक व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 03:20 PM2019-01-25T15:20:00+5:302019-01-25T15:31:19+5:30
जे रुग्ण खासगी रुग्णालयात जाऊन उत्तम शस्त्रक्रिया घेऊ शकत नाहीत, ज्यांची आर्थिक स्थिती गरीब आहे.
बंगळुरू - येथील सेंट. जॉन्स हॉस्पीटलमधील कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. किरोन व्हर्गेसे यांनी गरीब रुग्णांवर मोफत अँजिओप्लास्टी करणार असल्याचे परिपत्रकच जारी केले आहे. दररोज एक याप्रमाणे 30 रुग्णांवर ही मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गरिब रुग्णांसाठी खर्चिक असलेली ही शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात मोफत करण्यात येणार आहे हे विशेष.
जे रुग्ण खासगी रुग्णालयात जाऊन उत्तम शस्त्रक्रिया घेऊ शकत नाहीत, ज्यांची आर्थिक स्थिती गरीब आहे, अशा रुग्णांवर मला मोफत उपचार करायचे आहेत, असे किरन व्हर्गेस यांनी म्हटले आहे. व्हर्गेसे हे एकूण 30 अँजिओप्लासाटी शस्त्रक्रिया करणार आहेत. त्यासाठी काही मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी पैशांची मदत केली आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यातील 15 तारखेला या मोफत शस्त्रक्रिया शिबिराची सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी रुग्णांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. तरुण रुग्ण आणि कुटुंबातील कमावत्या व्यक्तीस या शस्त्रक्रियेसाठी प्राधान्य मिळणार आहे. दरम्यान, सध्या अँजिओप्लास्टी या शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात 1-2 लाख रुपयांचा खर्च होतो. तर जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार सध्या जगभरात ह्रदयरोगाशी संबंधित आजारात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तर वयवर्षे 40 ते 60 वर्षांच्या व्यक्तींवर अधिक प्रमाणात ही शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.