५० कोटींचा 'तो' श्वान निघाला भारतीय जातीचा; ईडीने धाड टाकल्यावर मालकाने सगळेच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 18:25 IST2025-04-17T18:20:48+5:302025-04-17T18:25:27+5:30
बंगळुरुती ५० कोटींच्या श्वानाच्या मालकावर ईडीने धाड टाकल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.

५० कोटींचा 'तो' श्वान निघाला भारतीय जातीचा; ईडीने धाड टाकल्यावर मालकाने सगळेच सांगितले
Dog Breeder S. Satish: गेल्या महिन्यात बंगळुरूमधील एका व्यक्तीने ५० कोटी रुपयांचे श्वान खरेदी केल्याचा दावा केला होत. बंगळुरू येथील प्रसिद्ध डॉग ब्रीडर आणि इंडियन डॉग ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस सतीश यांनी हा ५० कोटी रुपयांना हे दुर्मिळ श्वान खरेदी केले होते. हे जगातील सर्वात महागडे श्वान असल्याचे मानला जात होतं. हे श्वान मिश्र जातीचे असल्याचे सांगितले जात होतं. मात्र आता अंमलबजावणी संचलनालयाने एस सतीश यांच्या घरावर धाड टाकल्यानंतर महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
महिन्याभरापूर्वी एस सतीश यांनी मोठा गाजावाजा करत ५० कोटींचे वुल्फडॉग खरेदी केल्याचे सांगितले होते. त्यानंतर देशभरात या श्वानाची आणि एस सतीश यांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या श्वानाचे नाव काडाबोम्ब ओकामी आहे. ओकामी फक्त आठ महिन्यांचा आहे. तरीही, त्याचे वजन ७५ किलो आहे. एस सतीश यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये एका ब्रोकरमार्फत ओकामी खरेदी केले. अशातच बंगळुरूमध्ये ईडीच्या पथकाने एस सतीश यांच्या घरावर छापा टाकला. फेमा कायद्याच्या उल्लंघनासाठी हा छापा टाकण्यात आला.
टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, ईडीला या श्वानाची माहिती मिळताच त्यांचे पथक एस सतीशच्या घरी पोहोचले. श्वान खरेदी करण्यासाठी ५० कोटी रुपये कसे दिले हे ईडीला जाणून घ्यायचे होते. एस सतीशच्या खात्याची माहिती तपासली असता त्यामधून कोणताही व्यवहार झाला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या व्यवहारासाठी हवालाच्या पैशाचा वापर केला गेला का असा प्रश्न पडला. जेव्हा सतीशची समोरासमोर चौकशी करण्यात आली तेव्हा वेगळीच माहिती समोर आली. तपासात सतीशचे दावे खोटे असल्याचे सिद्ध झाले. सुरुवातीच्या तपासात, जो श्वान परदेशी जातीचा असल्याचा दावा करण्यात आला होता तो भारतीय असल्याचे समोर आले.
सतीश स्वतःला एक मोठा डॉग ब्रीडर म्हणवतो, पण प्रत्यक्षात तो आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कमकुवत असल्याचे तपासात समोर आले. जेव्हा ईडीने त्याला श्वान दाखवण्यास सांगितले तेव्हा त्याने त्याच्या एका मित्राकडे असल्याचे सांगितले. या उत्तरामुळे अधिक शंका निर्माण झाली.
दरम्यान, सतीशविरुद्ध ईडीला आधीच काही तक्रारी मिळाल्या होत्या. यामुळे, ईडीने त्याच्या उत्पन्न आणि खर्चाची सखोल चौकशी सुरू केली. सध्या तपास सुरू आहे. सतीशकडे इतके पैसे कुठून आले, त्याचा खरा व्यवसाय काय आहे आणि त्याने लोकांची दिशाभूल का केली याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न ईडीकडून सुरु आहे.