तरुणाचे 'ते' स्वप्न भंगले, इंडिगोला १.६० लाखांना पडले; भरावा लागला भरभक्कम दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 06:10 AM2021-06-01T06:10:10+5:302021-06-01T06:13:01+5:30
क्षमतेपेक्षा जास्त तिकीट विक्रीमुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्याच्या पदरी निराशा
- डॉ. खुशालचंद बाहेती
बंगळुरू : आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बक्षीस मिळालेल्या तरुणाची नासाची भेट इंडिगो विमान कंपनीच्या तिकिटाच्या गोंधळामुळे होऊ शकली नाही. याबद्दल इंडिगोला दोषी ठरवत बंगळुरू ग्राहक मंचने १ लाख ६० हजारांचा दंड ठोठावला.
केल्वीन मार्टीन हा जे.ई.ई.मध्ये कर्नाटकात सर्वप्रथम तर देशात दुसऱ्या क्रमांकावर आलेला तरुण. त्याने आयआयटी गोहत्ती येथे झालेली आंतरराष्ट्रीय स्पर्धा (टेक्नोथलॅान) जिंकली. बक्षिसात त्याला नासाला भेट देण्याचे निमंत्रण मिळाले. आंतरराष्ट्रीय प्रवास व भेटीचा सर्व खर्च नासा करणार होती.
१० ऑगस्ट २०१९ चे चेन्नई-दिल्ली विमानाचे तिकीट त्याने घेतले. पुढे दुपारी दिल्लीहून अमेरिकेला निघणाऱ्या विमानाचे तिकीट नासाने पाठविले होते. सकाळी ६.३० ला निघणारे विमान पकडण्यासाठी तो चेन्नई विमानतळावर वेळेत पोहोचला; पण विमानात जागा शिल्लक नसल्याचे ऐकून त्याला धक्काच बसला. त्याच्याकडे कन्फर्म तिकीट होते. त्याला बोर्डिंग पास देण्यात आला; पण त्यावर सीट क्रमांक शून्य लिहिण्यात आला होता. मार्टीनने नासाचे निमंत्रण , पुढच्या विमानाची तिकिटे दाखवून प्रवास करू देण्याची विनंती केली. मात्र, कोणीही प्रवासी आपली जागा देण्यास तयार नाही, असे सांगून त्याला विमानात बसू देण्यात आले नाही.इंडिगोने त्याला दुपारच्या विमानात जागा देऊ केली; पण दुपारी जाऊन पुढचे विमान मिळणार नव्हते. मार्टीन दु:खी होऊन परतला. त्याने इंडिगो व्यवस्थापनाकडे तक्रार केली; पण त्याला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. शेवटी डिसेंबर १९ मध्ये त्याने ग्राहक मंचकडे तक्रार दाखल केली.
इंडिगोने पहिला आक्षेप बंगळुरू मंचला या तक्रारीची दखल घेण्याचा अधिकारच नाही, असा घेतला. मात्र तो मंचने फेटाळला. यानंतर इंडिगोचे म्हणणे होते की, मार्टीनने तक्रारीत पूर्ण सत्य सांगितले नाही. त्यांना दुसऱ्या विमानात जागा किंवा तिकिटाची रक्कम परत व नियमाप्रमाणे २० हजार रुपये कंपनीने देऊ केले होते, जे मार्टीनने स्वीकारले नाही. मात्र, इंडिगोच्या वकिलाने या विमानाच्या क्षमतेपेक्षा जास्त तिकिटे विक्री केली होती, हे मान्य केले.
स्वप्न भंगले...
इंडिगोने जास्तीची तिकिटे विकली व इतर प्रवाशांकडून जागेचा त्याग करण्याची अपेक्षा केली. तिकिटाच्या घोटाळ्यामुळे एका तरुण व उगवत्या शास्त्रज्ञाचे नासाला भेट देण्याचे आयुष्यभराचे स्वप्न भंग पावले.
१,००,००० नुकसान भरपाई
५०,००० मानसिक ताणाबद्दल
८,६०५ तिकिटाची रक्कम
सर्व रक्कम व्याजासह देण्याचे आदेश
(बंगळुरू ग्राहक मंच)