पिण्याच्या पाण्याने गाड्या धुतल्या...; बंगळुरूमध्ये 22 जणांवर गुन्हा दाखल, 1.10 लाखांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 01:16 PM2024-03-26T13:16:45+5:302024-03-26T13:19:13+5:30
पाण्याचे संकट इतके भीषण आहे की, पिण्याच्या पाण्याच्या इतर वापरावर बंदी घातल्यापासून आतापर्यंत तब्बल 22 जणांवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे, तर एक लाखांहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे.
भारतातील सिलिकॉन व्हॅली बंगळुरू सध्या भीषण जलसंकटाचा सामना करत आहे. राज्यातील 240 पैकी 223 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पाण्याचे संकट इतके भीषण आहे की, पिण्याच्या पाण्याच्या इतर वापरावर बंदी घातल्यापासून आतापर्यंत तब्बल 22 जणांवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे, तर एक लाखांहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे.
बंगळुरू वॉटर सप्लाय अँड सीवरेज बोर्डाने (BWSSB) मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात शहरातील पिण्याचे पाणी वाहन धुण्यासाठी, बागकाम, बांधकाम आणि इतर कारणांसाठी वापरण्यास बंदी घातली होती. बोर्डाचे चेअरमन राम प्रशांत मनोहर सांगतात की, आम्हाला दक्षिण-पूर्व भागातून सर्वाधिक तक्रारी येत होत्या. आम्ही जनतेला पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले असून तसा इशाराही दिला आहे.
1.10 लाख रुपयांचा दंड वसूल
रिपोर्टनुसार, इतर कारणांसाठी पिण्याचे पाणी वापरल्याबद्दल बंगळुरूमधील 22 कुटुंबांना प्रत्येकी 5,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण 1.10 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात होळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही नियम लागू केले होते. बोर्डाने कावेरी नदी किंवा बोअरवेलचे पाणी होळीची पूल पार्टी आयोजित करण्यासाठी वापरू नये असे सांगितले होते.
दररोज पन्नास कोटी लिटर पाण्याची टंचाई
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यापूर्वी म्हटले होते की, बंगळुरूमध्ये पाण्याचे संकट सातत्याने वाढत आहे. बंगळुरूला दररोज सुमारे पन्नास कोटी लिटर पाण्याची टंचाई भासत आहे. शहराला दररोज 147 कोटी लिटर पाणी कावेरी नदीतून मिळते तर 65 कोटी लिटर पाणी बोअरवेलमधून येते.
चाळीस वर्षांतील सर्वात मोठ्या जलसंकटाचा सामना
कर्नाटक गेल्या चाळीस वर्षांतील सर्वात मोठ्या जलसंकटाचा सामना करत आहे. अलीकडेच, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले होते की, गेल्या 30 ते 40 वर्षांत इतका दुष्काळ आपण पाहिला नाही. यापूर्वीही येथे दुष्काळ पडला आहे. मात्र आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर परिसर दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेले नाहीत.